Mon, Jun 17, 2019 02:52होमपेज › Satara › कोरेगावात टेंडरशाही चालू देणार नाही :  उदयनराजे (Video)

कोरेगावात टेंडरशाही चालू देणार नाही :  उदयनराजे (Video)

Published On: Sep 10 2018 9:47AM | Last Updated: Sep 10 2018 10:54AMकोरेगाव : प्रतिनिधी 

कोरेगावकर एकत्र येत नाहीत, तुम्ही सर्वांनी एकत्र यावे, मी तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही निर्णय घ्या, तुमचा निर्णय हा फक्‍त आमदारकीला नाही तर खासदारकीलाही लागू होतो. लक्षात ठेवा प्रत्येक कोरेगावकरांच्या घरात काठ्या-कुर्‍हाडी आहेत. यापुढे कोरेगावात टेंडरशाही चालू देणार नाही,  असा हल्लाबोल खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी आ. शशिकांत शिंदे यांच्यावर केला. 

एकसळ, ता. कोरेगाव येथे स्वाभिमानी विचार मंचच्या वतीने आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जि.प.चे माजी उपाध्यक्ष रवी साळुंखे,  प्रा. अनिल बोधे, नाना भिलारे आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

खा. उदयनराजे भोसले म्हणाले, बरं झालं माझ्या वाढदिवसाला जिल्हा परिषद मैदानावर आमदार आले नाहीत; अन्यथा मीच गर्दी जमवली, असेही ते म्हणायला कमी पडले नसते.कोरेगाव तालुका सुजलाम आणि समृद्ध आहे. मग आपण बाहेरचे नेतृत्व का स्वीकारायचे? विधान सभेपाठोपाठ इतर निवडणुकातही बाहेरचे उमेदवार येऊ लागले आहेत. कोणाच्या दहशतीखाली अन्याय सहन करायचा? मग आपापल्या घरातील काठ्या- कुर्‍हाडी काय कामाच्या? त्या आता पुढील काळात बाहेर काढा. बाहेरचा दहशतवाद संपवण्यासाठी मी तुमच्या पाठीशी आहे. पुढील काळात कोरेगाव तालुक्यात कोणाचीही दंडेलशाहीच काय टेंडरशाहीही चालू देणार नाही, अशी गर्जना खा. उदयनराजेंनी केली. 

प्रा. अनिल बोधे म्हणाले, राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून निष्ठेने काम करणार्‍या कार्यकत्यार्ंंचा राजकीय अंत विद्यमान आमदारांनी स्वत:च्या फायदयासाठी केला. 9 वर्षे मतदार संघाचे नेतृत्व करणार्‍या आमदारांनी विकासकामे न करता गावोगावचा विकास रखडवला. ज्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विजयासाठी निष्ठेने काम केले. त्या सर्व निष्ठावान कार्यकर्त्यांना राजकारणातून, सार्वजनिक जीवनातून उद्ध्वस्त करण्याचे काम केले आहे. त्यासाठीच स्वाभिमानी विचारमंचची स्थापना करून गेल्या वर्षभरात भिशी मेळाव्याच्या माध्यमातून शशिकांत शिंदे हटाव मोहीम राबवली आहे. आज खा. उदयनराजे भोसले यांनी या मेळाव्यात दिलेल्या समर्थनामुळे कार्यकत्यार्ंचे  मनोबल निश्‍चितपणे वाढले आहे. 

अजय कदम, नाना भिलारे, माजी तालुका अध्यक्ष विठ्ठलराव कदम यांनी मनोगत व्यक्‍त केले. प्रास्ताविक अ‍ॅड.पांडुरंग भोसले यांनी केले. सुनिल खत्री यांनी आभार मानले.

यावेळी बाळासाहेब फाळके, नारायण फाळके, उपनगराध्यक्ष जयवंत पवार, पोपटराव कर्पे, टी.जे.सणस, प्रदिप फाळके, अ‍ॅड.विजयसिंह शिंदे,   हिंदुराव भोसले, निवृत्‍ती भोसले, सुरेश शेलार, दत्तात्रय भोसले, गणेश भोसले उपस्थित होते.