Sat, Jul 20, 2019 14:58होमपेज › Satara › वृद्धाची सहा एकर जमीन सावकारीतून बळकावली

वृद्धाची सहा एकर जमीन सावकारीतून बळकावली

Published On: Dec 06 2017 1:41AM | Last Updated: Dec 05 2017 10:41PM

बुकमार्क करा

कोरेगाव : प्रतिनिधी

सातार्‍यातील खंडणीखोर प्रमोद ऊर्फ खंड्या धाराशिवकरच्या टोळीच्या विरोधात आता कोरेगाव पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल झाला आहे. 50 लाख रुपये व्याजाने देऊन रेवडीतील दोन वद्ध शेतकर्‍यांची सहा एकर जमीन सावकारीतून बळकावल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

रेवडी (ता. कोरेगाव) येथे हणमंत श्रीपती भिलारे व जगन्नाथ केसू आवारे यांची शेती आहे. त्यांचे सोसायटीचे सचिव दशरथ भोसले यांच्याशी जवळचे संबंध होते. दशरथ भोसले व जळगाव, ता. कोरेगाव येथील लक्झरी बसचे व्यावसायिक दिनकर यशवंत जाधव यांचे जवळचे संबंध होते व आर्थिक व्यवहारदेखील त्यांच्यामध्ये होते. 2015 सालात मे महिन्यामध्ये दिनकर जाधव हे आर्थिक अडचणीत आल्यानंतर त्यांना 50 लाख रुपयांची गरज होती. दशरथ भोसले हे दि. 15 मे रोजी रेवडीत गेले आणि त्यांनी हणमंत श्रीपती भिलारे व जगन्नाथ केसू आवारे यांना बोलावून घेत माझे मेव्हणे प्रदीप धोंडिराम घाडगे (रा. राऊतवाडी, ता. कोरेगाव, हल्ली विकासनगर-खेड, सातारा) याने तुमची जमीन गहाण ठेवून 50 लाख रुपये देणारा माणूस पाहिला असल्याचे सांगितले. त्यानंतर सर्व जण घाडगे याच्या विकासनगर येथील घरी गेले. तेथून घाडगे याने सर्वांना प्रमोद ऊर्फ खंड्या धाराशिवकर याच्याकडे नेले. त्यानंतर खोटा दस्त करून तीन टप्प्यांत पैसे दिले.  त्यानंतर वसुलीसाठी वेळोवेळी धमकावणे, मारहाण करणे असे प्रकार सुरूच होते. सुरुवातीला प्रदीप धोंडिराम घाडगे व संजय रामचंद्र जाधव याच्या नावे केलेला दस्त खंड्या याने दि. 30 जानेवारी 2016 रोजी हृदयनाथ शामराव पार्टे (रा. कोडोली-सातारा) व लक्ष्मीबाई रामचंद्र जाधव (रा. प्रतापसिंहनगर खेड-सातारा) यांच्या नावे करून दिला आहे. दि. 18 फेब्रुवारी 2017 रोजी लक्ष्मीबाई जाधव यांच्या नावे जमीन केल्याचे निदर्शनास आले. ही बाब आवारे बंधूंनी दिनकर जाधव यांच्या कानावर घातली; मात्र त्यांनी लक्ष दिले नाही. एकूणच खंड्या धाराशिवकर व त्याच्या टोळीने व्याजापोटी जमिनीचा दस्त लबाडीने करून घेत, त्यावरील पिके चोरून नेली आहेत. याप्रकरणी हणमंत श्रीपती आवारे यांनी प्रमोद ऊर्फ खंड्या धाराशिवकर, प्रदीप धोंडिराम घाडगे, संजय रामचंद्र जाधव, हृदयनाथ शामराव पार्टे, लक्ष्मीबाई रामचंद्र जाधव, हाजी इनामदार व 8 ते 10 अनोळखी साथीदारांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक संभाजी म्हेत्रे व सहायक फौजदार वसंत साबळे तपास करत आहेत.