Sun, Apr 21, 2019 04:34होमपेज › Satara › पाण्यासाठी धडपडणार्‍या जवानाचा मृत्यू

पाण्यासाठी धडपडणार्‍या जवानाचा मृत्यू

Published On: Feb 04 2018 11:22PM | Last Updated: Feb 04 2018 11:12PMकोरेगाव : प्रतिनिधी 

जायगाव, ता. कोरेगावचे  सुपुत्र आणि भारतीय वायुसेनेत  कार्यरत असलेले घनश्याम शिंदे (वय 31) हे पाणी फौंडेशनच्या जन जागृतीसाठी दीड महिन्याची सुट्टी घेवून आले होते. धुळे येथे पाणी फौंडेशनचे ट्रेनिंग देत असताना ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव मूळ गावी आणल्यानंतर भारतीय वायुदलाच्यावतीने त्यांना मानवंदना देण्यात आली. हजारोंच्या उपस्थितीत त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.

प्रत्येक कार्यात हिरहिरीने सहभागी असणारे घनश्याम शिंदे हे भारतीय वायुसेना दलामध्ये लोहगाव (पुणे) येथे नोकरीला होते. पाणी फौंडेशनच्या कार्यात ते काही वर्षांपासून सहभागी होते. दोन वर्षांपूर्वी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत जायगाव गावाने भाग घेतला होता. गावाला पाणीदार करण्याची संधी आलेली आहे, या आशेने  घनश्याम  रजा काढून गावकर्‍यांसोबत प्रशिक्षणास आले होते.

 त्यांनी फक्त प्रशिक्षणच घेतले नाही तर गावाला पाणीदार करण्यात सिंहाचा वाटा उचलला. या स्पर्धेत जायगावने राज्यात द्वितीय क्रमांक मिळवला होता. पाणलोट विकासातून गावे सहज पाणीदार होऊ शकतात हे घनश्याम यांना मनोमन पटले होते. त्यामुळेच ते पाणी फौंडेशनच्या कार्यात खास सुट्टी काढून सहभागी होत होते. अनेक गावे पाणीदार करण्यासाठी ते आघाडीवर होते.

नुकतेच ते पाणी फौंडेशनच्या जनजागृतीसाठी खास दीड महिन्याची सुट्टी घेवून  आले होते. धुळे येथील पाणी फौंडेशनच्या प्रशिक्षणादरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी रसिका व कन्या ईशानी (वय 2), असा परिवार आहे.