Mon, May 20, 2019 22:09होमपेज › Satara › रहिमतपूरमध्ये चाकूचा धाक दाखवून लुटले

रहिमतपूरमध्ये चाकूचा धाक दाखवून लुटले

Published On: Aug 22 2018 12:58AM | Last Updated: Aug 21 2018 11:24PMकोरेगाव : प्रतिनिधी 

रहिमतपूर ते वडूज मार्गावर विजयनगर रहिमतपूर येथे चोरट्यांनी बंगल्याचा कडीकोयंडा उचकटून चाकूची दहशत दाखवत दोन महिलांच्या गळ्यांतील मंगळसूत्र लंपास केले. या घटनेने परिसरात घबराट पसरली असून नागरिकांमध्ये असुरक्षेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

विजयनगर रहिमतपूर येथील अरुण गाडे कुटुंबीय सोमवारी रात्री बंगल्यात झोपले होते. पत्नी सौ. संगीता, मुलगी सौ. सोनाली माने व लहान बाळ असे हे तिघे एका खोलीत झोपले  होते. मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास मुलीला जाग आली असता 22 ते 25 वयोगटातील चेहरा रुमालाने बांधलेले 

दोन चोरटे संगीता यांच्या गळ्यातील मंगळसूत्र काढत होते. प्रसंगावधान दाखवत सोनालीने वडिलांना हाक मारली. मात्र चोरट्यांनी त्यांच्या खोलीला बाहेरून कडी लावली. चाकूचा धाक दाखवत दोघींच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून घेवून पोबारा केला. 

घटनेची खबर रहिमतपूर पोलिस ठाण्यात देण्यात आली. मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयीत आरोपींचे वर्णन व चोरीचा तपास कामी ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले. चोरी झालेल्या घरातील नातलगांनी चोरीपेक्षा लेक व नात सुरक्षीत असल्याचे पाहून निश्‍वास सोडला. असे असले तरी रहिमतपूर पोलिस ठाणे हद्दीत वाढत्या चोर्‍यांमुळे नागरिक असुरक्षित बनले आहेत. अशा घटना रोखण्यासाठी पोलिसांनी रात्रगस्त कडक करण्याची मागणी होत आहे. चोरट्यांना जरब बसेल अशी कामगिरी पोलिसांनी करावी, अशी अपेक्षाही व्यक्‍त केली आहे.