होमपेज › Satara › ‘प्रधानमंत्री आवास’चे राज्यात पहिले घर खोजेवाडीत

‘प्रधानमंत्री आवास’चे राज्यात पहिले घर खोजेवाडीत

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 5 हजार 129 घरकुलांपैकी 2 हजार 676  घरे बांधून पूर्ण झाली आहेत. यावर्षी दिलेल्या उद्दीष्टामध्ये राज्यात पहिले घरकुल जिल्ह्यात बांधून पूर्ण केले असून सातारा तालुक्यातील खोजेवाडीने हा मान पटकावला आहे. दरम्यान, भुमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करण्याबाबत गटविकास अधिकार्‍यांना सूचना देण्यात आल्याची माहिती जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांनी दिली.

राज्य शासनाने दिलेल्या उद्दीष्टानुसार प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2017 व 18 मध्ये  सातारा जिल्ह्यातील खोजेवाडी, ता. सातारा येथील  श्रीमती कमल नारायण गायकवाड यांना घरकुल मंजूर झाले होते. त्यांनी घरकुलाचे बांधकाम 40 दिवसात पूर्ण करून महाराष्ट्र राज्यातील  प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 2017 -18 मधील पहिले घरकुल पूर्ण करण्याचा मान  मिळवला. यासाठी खोजेवाडीचे ग्रामसेवक बागल यांनी सहकार्य केले. ज्या लाभार्थींचा प्राधान्य  यादीमध्ये समावेश झाला नाही परंतु पात्र आहेत त्यांचे ग्रामसभेमार्फत प्राप्त झालेले अर्ज व तालुकास्तरावर प्राप्त झालेल्या अर्जाची पडताळणी करण्याचे काम नोव्हेंबरपर्यंत होईल. पात्र लाभार्थीच्या यादीस ग्रामसभेची मान्यता दि. 15 डिसेंबर रोजी ग्रामसभा घेवून घेण्यात येणार आहे. त्याचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिली.

ज्या घरकुलपात्र भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी जागा नाही, अशा लाभार्थ्यांना  शासनाची जागा उपलब्ध करून तसे प्रस्ताव सादर करण्याबाबत सर्व गटविकास अधिकार्‍यांना सूचना केल्या असल्याचे डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.

‘रमाई आवास’अंतर्गत 1509 घरकुलांचे काम पूर्ण

रमाई आवास योजनेअंतर्गत 1 हजार 952 घरकुलाचे उद्दीष्ट होते त्यापैकी 1 हजार 509 घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. शबरी आदिवासी योजनेअंतंर्गत 60 पैकी 55 घरकुले पूर्ण झाली आहेत. रमाई आवास योजनेअतंर्गत 2017 - 18 साठी 300 लाभार्थ्यांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आल्याचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नितीन थाडे यांनी सांगितले. पंडित दीनदयाळ योजनेंतर्गत 2 हजार 400 घरांचे उद्दीष्ट होते. त्यापैकी 270 लाभार्थ्यांना प्रत्येकी 500 चौ. फूट घरकुलासाठी जागा खरेदीसाठी निधी प्राप्त झाला असून त्यांना जागा देण्याची कार्यवाही सुरू आहे.