Wed, May 22, 2019 22:25होमपेज › Satara › प्रतापसिंहनगरमध्ये घडताहेत सनदी अधिकारी 

प्रतापसिंहनगरमध्ये घडताहेत सनदी अधिकारी 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

खेड : वार्ताहर 

एकेकाळी गुन्हेगारीचा ठपका पडलेल्या प्रतापसिंहनगरमध्ये आता शैक्षणिक क्रांतीच्या माध्यमातून बदल होवू लागला असून या नगरामधील सुमारे 15 ते 20 युवक सनदी अधिकारी म्हणून शासनाच्या विविध पदावर रुजू होवून कर्तव्यदक्षपणे काम करत आहेत. प्रतापसिंहनगराच्या या बदलाचे स्वागत होत असून येथील गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन होण्याची गरजही यानिमित्ताने व्यक्त होत आहे. 

गेल्या 15 ते 20 वर्षापूर्वी अवचितनगर म्हणून ओळखली जाणारी प्रतापसिंहनगर ही वस्ती पोलिसांच्या कायम रडारवर होती. गुन्हेगारांचे आश्रयस्थान म्हणून बघण्याच्या अनेकांच्या नजरा या वस्तीकडे लक्ष वेधत होत्या परंतु पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या येथील काही ग्रामस्थांनी, युवकांनी शिक्षणातून समृद्धीचा मंत्र जपत गरीबीच्या परिस्थितीवर मात करुन प्रतापसिंहनगरमध्ये बदल घडवला. जिद्द, आत्मविश्‍वास चिकाटीच्या जोरावर शासनाच्या विविध परिक्षांमध्ये यश प्राप्त केले आणि या नगरामध्ये न्यायाधिश, डॉक्टर, पोलिस अधिकारी, प्राध्यापक, इंजिनिअर्स, शिक्षक, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, उद्योजक, रेल्वे पोलिस, खेळाडू, साहित्यिक अशा विविध पदावर कर्तव्य बजावत या वस्तीचे नाव उज्ज्वल करण्याचा मान मिळवला. 

या गुणवंतांचा युवा विचार मंचच्यावतीने जिल्हा पोलिस उपअधीक्षक खंंडेराव धरणे, पोलिस निरीक्षक अनिल कोळी, प्रा. आडके, जि.प. सदस्या सौ. मधु कांबळे, पंचायत समितीचे सभापती मिलिंद कदम, सरपंच सौ. सिताबाई गायकवाड, सदस्य सरस्वती बोकेफोडे, कांतीलाल कांबळे यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. 

यावेळी अनिल कोळी, प्रा. डॉ. अरुण पौंडमल, पोलीस उपनिरीक्षक जयदीप उदागे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास सुभाष आडागळे, गोकुळ उदागे, श्रावण लंकेश्‍वर, नितीन लांडगे, मनोज अडागळे, तुषार बोकेफोडे, प्रकाश खुने, श्रावण पुलावळे, संदिप वाघमारे, प्रदिप उदागे, योगेश पौंडमल, सुरेश बोकेफोडे, जॉकी लंंकेश्‍वर, अवि पौंडमल, प्रशांत उदागे, भिमराव सकट यांनी सहकार्य केले. प्रास्ताविक अंकुश साठे यांनी केले. सूत्रसंचलन सूर्यकांत अडागळे यांनी तर गोकुळ उदागे यांनी आभार मानले.