होमपेज › Satara › कृषी अधीक्षक जितेंद्र शिंदे निलंबित

कृषी अधीक्षक जितेंद्र शिंदे निलंबित

Published On: Dec 20 2017 1:44AM | Last Updated: Dec 19 2017 11:53PM

बुकमार्क करा

खटाव : प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कृषी विभागाने केलेल्या अनेक कामांमध्ये मोठा अपहार झाला असून, कृषी आयुक्तालय आणि थेट मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश देऊनही सातार्‍याचे कृषी अधीक्षक कागदपत्रे हजर करत नाहीत. होणारी चौकशी दाबण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मंत्रालयापर्यंत पैसे द्यावे लागतात, असे उघड उघड सांगणार्‍या या अधिकार्‍याला त्वरित निलंबित करा, अशी मागणी आ. जयकुमार गोरे यांनी लक्षवेधीद्वारे नागपूर  अधिवेशनात केली. त्यावर उत्तर देताना कृषी राज्यमंत्री ना. सदाभाऊ खोत यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे यांना निलंबित केल्याची   घोषणा केली.          

सातारा जिल्हा कृषी विभागाच्या कारभाराबाबत लोकप्रतिनिधींकडून  गेल्या दोन वर्षांत अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. डीपीसीच्या बैठकीतही अनेकवेळा हा विषय ऐरणीवर आला होता. कृषी विभागात सुरु असलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणीही अनेकवेळा करण्यात आली होती. नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात आ. जयकुमार गोरे यांनी लक्षवेधीद्वारे हा प्रश्‍न सोमवारी उपस्थित केला.

विधीमंडळाच्या  सभागृहात बोलताना आ. जयकुमार गोरे म्हणाले, राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानातील 70 टक्क्यांपेक्षा अधिक कामे कृषी विभागाकडून केली जात आहेत. सातारा जिल्ह्यातही गेल्या दीड वर्षांत झालेल्या कामांपैकी सुमारे 100 कोटींची कामे जिल्हा कृषी विभागाने केली आहेत. सातारा जिल्हा कृषी विभागाकडून करण्यात आलेल्या अनेक कामांमध्ये मोठा अपहार झाला आहे. बहुतांश कामे 3 लाखांच्या आत बसविण्यासाठी त्या कामांचे तुकडे करण्यात आले आहेत.

 मर्जीतील ठेकेदारांना कामे देवून मोठा घोटाळा करण्यात आला आहे. आम्ही या घोटाळ्याबाबत अनेक तक्रारी केल्या. पालकमंत्री आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही याबाबत चौकशीचे आदेश दिले होते. मात्र, सातार्‍याचे कृषी अधिक्षक मंत्रालयापर्यंत पोहचले आहेत. 30 ते 35 कोटींचा अपहार झाकण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्र्यांची चौकशी थांबवण्यासाठी अधिवेशनात त्याबाबत लक्षवेधी लागू नये, म्हणून ते वजन वापरत आहेत. आताही ते चौकशी थांबवण्यासाठी दोन दिवसांपासून इथे आले असल्याचे आ. जयकुमार गोरे यांनी सांगितले.

जलयुक्त शिवारच्या कामांमध्ये सातारा जिल्ह्यात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे आदेश एप्रिल 2016 मध्ये  कृषी आयुक्तालयाला देण्यात आले होते. कृषी अधिक्षकांनी त्या चौकशीला सहकार्य केले नाही. पुन्हा यावर्षी चौकशीचे आदेश देण्यात आले. याबाबतची कागदपत्रे सादर करण्यासाठी कृषी कार्यालयाला  पत्रे पाठवण्यात आली, मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. सातार्‍याचे कृषी अधिक्षक जितेंद्र शिंदे मनमानी करतात. जनतेशी ते उध्दटपणे वागतात.  35 कोटींचा घोटाळा दाबण्यासाठी इतर अधिकार्‍यांवर ते दबाव आणत आहेत. कृषीमंत्री आणि पालकमंत्री यांच्या बैठकीला ते रिव्हॉल्वर घेऊन जातात. अगोदरही त्यांचे अनागोंदी कारभाराबाबत निलंबन झाले होते, अशी माहिती आ. जयकुमार गोरे यांनी दिली. 

गेल्या दीड वर्षांत सातारा जिल्हा कृषी विभागात झालेल्या घोटाळ्याची एसआयटीकडून चौकशी करुन कृषीअधिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना निलंबित करण्यात यावे. दुष्काळी तालुक्यांमधे जलसंधारणाची कामे दर्जेदार झाली पाहिजेत. तिथल्या जनतेला अशा कामांची खूप गरज असून नेमक्या याच कामांमधे भ्रष्टाचार होत असेल तर हे दुर्दैव असल्याचे आ. गोरे म्हणाले.