Wed, Jul 17, 2019 16:57होमपेज › Satara › ग्रामीण भागात प्लास्टिकचा खुलेआम वापर 

ग्रामीण भागात प्लास्टिकचा खुलेआम वापर 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

खटाव : प्रतिनिधी 

राज्य सरकारने पाडव्यापासून लागू केलेली प्लास्टिक बंदी ग्रामीण भागात कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. आठवडा बाजार तसेच इतर दिवशीही प्लास्टिक पिशव्यांचा खुलेआम वापर सुरु आहे. सरकारने कडक शिक्षेची तरतूद करुनही प्लास्टिकचा वापर सुरु असल्याने राज्य शासनाने लागू केलेली प्लास्टिकबंदी यशस्वी होण्याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

प्लास्टिक नैसर्गिक आणि जैविकदृष्ट्या विघटनशील नसते. प्लास्टिक पिशव्या आणि प्लास्टिकच्या इतर उत्पादनांच्या वापरामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यात अडथळे निर्माण होवून पाणी तुंबल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. प्लास्टिक पिशव्या जनावरांच्या पोटात जाऊन त्यांचा मृत्यू ओढवतो. प्लास्टिकच्या अतिवापरामुळे पर्यावरणावर होणारे गंभीर परिणाम रोखण्यासाठी प्लास्टिक साठवणूक, वितरण आणि विक्रीवर राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने बंदी घातली आहे.

यामुळे प्लास्टिकच्या पिशव्या, थर्माकोल ताट, वाट्या, कप, ग्लास, बॅनर आदी अनेक वस्तू आता वापरता आणि विक्री करता येणार नाहीत. प्लास्टिक बंदीनंतर दुकाने, मॉल्स तसेच विविध आस्थापनांच्या परवान्यांसाठी प्लास्टिक बंदीची अट घालण्यात आली आहे. बंदीनंतर प्लास्टिकचा वापर करणार्‍यांवर फौजदारी गुन्ह्यासह तीन ते सहा महिन्यांची शिक्षा आणि 25 हजार रुपयांच्या दंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

शासनाने मोठा गाजावाजा करत प्लास्टिकबंदी लागू केली, मात्र ग्रामीण भागात अद्याप काटेकोरपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही. ग्रामीण परिसरातील आठवडा बाजारात प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत आहे. प्लास्टिक पत्रावळ्या, द्रोण तसेच थर्माकोलच्या विविध वस्तूंचा वापर पूर्वीप्रमाणेच होत आहे. याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.
 


  •