होमपेज › Satara › उरमोडीसाठी त्वरित विद्युत भार द्या 

उरमोडीसाठी त्वरित विद्युत भार द्या 

Published On: Jan 12 2018 1:57AM | Last Updated: Jan 11 2018 10:33PM

बुकमार्क करा
खटाव : प्रतिनिधी  

उरमोडी उपसा सिंचन योजनेसाठी लागणारा वाढीव विद्युत भार त्वरित उपलब्ध करुन देण्याबरोबरच हाय टेन्शन लाईनचे काम येत्या आठ महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश उर्जामंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी महापारेषणच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना दिले. आ. जयकुमार गोरे यांच्या मागणीवरुन उरमोडी योजनेच्या वाढीव विद्युत भार आणि एच टी लाईन टाकण्याच्या कामाबाबत उर्जामंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.   बैठकीस आ. जयकुमार गोरे, महापारेषणचे मुख्य कार्यकारी संचालक राजूकुमार मित्तल, प्रकल्प संचालक आर. डी. चव्हाण, संचालन संचालक जी. टी. मुंडे, अधिक्षक अभियंता सिन्हा, कार्यकारी अभियंता गायकवाड आदींची उपस्थिती होती. 

आ. जयकुमार गोरे यांनी उरमोडी योजनेसाठी लागणार्‍या 15 एच टी लाईनच्या कामाचे  पैसे महापारेषण कंपनीकडून भरुनही क्षेत्रीय स्तरावरुन या कामास विलंब होत असल्याची तक्रार केली होती. उरमोडी योजनेचे पाणी माण आणि खटाव तालुक्यांना पूर्ण क्षमतेने मिळणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी योजनेच्या पंपहाऊसमधील नवे, जुने पंप सुरु ठेवणे क्रमप्राप्त आहे. या सर्व पंपांसाठी लागणारा  एम व्हि ए वाढीव विद्युत भार त्वरित मिळावा, अशी मागणी आ. गोरेंनी केली होती. एच टी लाईन टाकण्याच्या कामात पैसे भरुनही दिरंगाई होत असल्याबद्दल बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त करत हे काम त्वरीत पूर्ण करण्याचे आदेश दिले. महापारेषण कंपनीला मार्च अखेरपर्यंत अन्य ठिकाणावरुन  50 एम व्ही ए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर आणून देण्याचे तसेच अतित येथे हा ट्रान्सफॉर्मर बसवून उरमोडीसाठी अतिरिक्त भार देण्याचेही त्यांनी आदेश दिले. जी. टी. मुंडे यांनी ही कामे वेळेत करण्याची ग्वाही दिली. 

कृष्णा खोरे विकास महामंडळाकडील विद्युत विभागाच्या आराखड्यास महापारेषणने मान्यता न दिल्याने महामंडळाच्या कामाचे अंदाजपत्रक तयार होवू शकत नसल्याची बाब बावनकुळे यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी नकाशाला तात्काळ मान्यता देण्याचे आदेश दिले.