Thu, Aug 22, 2019 03:51होमपेज › Satara › खटाव तालुक्यात कडकडीत बंद 

खटाव तालुक्यात कडकडीत बंद 

Published On: May 25 2018 11:36PM | Last Updated: May 25 2018 10:56PMखटाव : प्रतिनिधी 

जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेचे उर्वरित काम त्वरित मार्गी लावा, पेट्रोल, डिझेलचे दर कमी करा आणि शेतीमालाला योग्य दर द्या, अशा विविध मागण्यांसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पुकारलेल्या बंदला खटाव तालुक्याच्या उत्तर भागात 100 टक्के प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. 

जिहे-कठापूरचे काम त्वरित मार्गी लावा अन्यथा लवकरच आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव आणि सहकार्‍यांनी निवेदनाद्वारे दिला. खटाव आणि माण या दुष्काळी तालुक्यांची लाईफलाइन ठरणार्‍या जिहे-कठापूर  उपसा सिंचन योजनेचे काम रखडल्याने शिवसेनेसह दोन्ही काँग्रेसने खटाव तालुका बंदची हाक दिली होती. दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या वतीने मोळ ते वर्धनगड अशी पदयात्रा काढण्यात आली होती. शिवसैनिकांनी वर्धनगड बोगद्याजवळ ठिय्याही दिला होता. कृष्णा खोरे अधिकार्‍यांबरोबर झालेल्या चर्चेतून तोडगा न निघाल्याने कडकडीत बंद पाळण्यात आला.

खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील पुसेगाव, बुध, ललगुण, डिस्कळ, निढळ, वर्धनगड तसेच तालुक्याचे ठिकाण असलेल्या खटावमधे बंद 100 टक्के यशस्वी झाला. भाजपविरोधी सर्वपक्षीयांनी पुकारलेल्या बंदला शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक आणि सर्वसामान्य जनतेने उत्स्फूर्त पाठिंबा दिला. बंदमुळे सर्वच गावांतील बाजारपेठांमधे शुकशुकाट जाणवत होता. चौकाचौकांत रखडलेली जिहे-कठापूर  योजना आणि वाढत्या महागाईची चर्चा ऐकायला मिळत होती. शिवसैनिकांनी पुसेगाव पोलिस ठाण्याचे सपोनि संभाजीराव गायकवाड यांना निवेदन दिले.