खटाव / प्रतिनिधी
खटाव तालुक्यातील जाखणगावच्या जलसंधारणाची दखल आता राज्य आणि देशच नव्हे तर जागतिक पातळीवर घेण्यात येत आहे. चौदा देशांच्या जलदूतांनी जाखणगावमध्ये चक्क दोन दिवसांचा मुक्काम ठोकून गावकऱ्यांनी केलेल्या जलसंधारणाच्या कामाची पाहणी केली. जाखणगावकरांनी गेल्या ८ वर्षात तन मन आणि धन अर्पून जलसंवर्धनाच्या केलेल्या अनोख्या कामांनी पाहुण्यांना अक्षरश भुरळ पाडली.
गेल्या आठ वर्षात जाखणगावने जलसंधारणाची अनेक कामे केली आहेत. हजारो लोकांनी या गावाला भेट देवून पाणी अडविण्याचे धडे गिरविले आहेत. जाखणगावकरांनी जलसंधारणाची कामे करण्यासाठी दिलेला रोमहर्षक लढा ह्याची देहा ह्याची डोळा पाहून परदेशी पाहूणेही थक्क झाले. आता १४ देशातील जलदूत या कामाचा डंका आपापल्या देशात वाजवणार आहेत. कॉक्स स्कॉलर प्रोग्रॅम या आंतरराष्ट्रीय संस्थेमधील १४ देश शांतता,तंटामुक्ती आणि नेतृत्वगुण विकासाच्या त्रिसुत्रीवर एकत्र येऊन या तत्वप्रणालीचा जगभर प्रसार करत आहेत. वर्ण द्वेष,जागतिक तापमान वाढ,पर्यावरणाचा होणारा ह्रास, प्रदूषण, पाणी अशा विषयांवर अभ्यास करून संस्थेच्या प्रतिनिधींद्वारे त्या,त्या देशात शांतीचा आणि प्रदूषण मुक्तीचा संदेष देण्याचा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे.
फिलिपिन्स,इंडोनेशीया,नेपाळ,ऑस्ट्रेलिया,न्युझिलंड,अमेरीका,रशिया,अफगाणिस्तान,अर्मेनिया,केनिया,तिबेट या देशांमधील प्रतिनिधीनी या वर्षी पाणीटंचाईवर लक्ष केंद्रीत करून भारतात भेट देण्याचे आयोजन केले. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली आहेत. त्यातही खटाव तालुक्यातील जाखणगावसारख्या छोट्या गावाने गेल्या आठ वर्षात प्रसिध्द जलतज्ञ डॉ. अविनाश पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक जलसंधारणाची कामे केली. या गावाने आजूबाजूच्या अनेक गावांना अशी कामे हाती घेण्यासाठी प्रेरीत केले. या पार्श्वभुमीवर सदरच्या प्रतिनिधींनी जाखणगावला भेट दिली. इथे पावसाचे प्रमाण अत्यल्प असुनही, गावकऱ्यांनी पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब आडवण्यासाठी विविध प्रकारची कामे केली आहेत. जलसंधारणाच्या कामात सिसीटी,सिमेंट बंधारे, नाला बडींग,ओढे खोलीकरण आणि रुंदीकरणाबरोबरच बोअर रिचार्ज,छोट्या नाल्यांवर बांधलेले जे.पी.पॅटर्न, काँक्रिट ब्लॉक अशा कामांमधील नाविन्यता पाहून परदेशी पाहूणे चांगलेच प्रभावित झाले.