Tue, Jul 23, 2019 04:05होमपेज › Satara › विलासपूर, संभाजीनगरमध्येही काविळीचे रुग्ण

विलासपूर, संभाजीनगरमध्येही काविळीचे रुग्ण

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोडोली : वार्ताहर

काविळीची साथ आणखी फैलावत चालली असून रूग्णसंख्येत वाढ झाली आहे. सातारा शहरानंतर आता उपनगरात काविळीचे रूग्ण आढळून आले आहेत. विलासपूर, संभाजीनगर औद्योगिक वसाहत कोडोली, धनगरवाडी परिसराला पाणी पुरवठा करणार्‍या जीवन प्राधिकरणाकडून दूषित पाणी पुरवठा होत असल्याने या परिसरातही बर्‍याच जणांना काविळीची लागण झाली आहे. त्यामुळे येथील जनतेमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

विलासपूरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने पक्के गटर बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यातच पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईप लाईन असून तेथे गटाराचे पाणी पाईपलाईनमध्ये मिसळत असल्याने विलासपूर ग्रामपंचायत हद्दीत अनेक कॉलनीमध्ये काविळीचे रुग्ण आढळून येत असून दिवसेंदिवस काविळीच्या रुग्ण  संख्येत वाढ होत आहे. 

जीवन प्राधिकरण, औद्योगिक वसाहत व काही ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा करणार्‍या जॅकवेल आहेत. त्या जॅकवेलच्या वरील बाजूस दोन ते तीन ओढ्यांचे दूषित सांडपाणी कृष्णा नदीच्या पात्रात मिसळत आहे. तेच दूषित पाणी जॅकवेलमध्ये जात आहे. जॅकवेलमधून त्याच दूषित पाण्याचा पुरवठा जलशुद्धीकरण केंद्रांना केला जात आहे.

संबंधित विभागाकडून पाणी शुद्धीकरणासाठी कितीही प्रयत्न केले तरी काही प्रमाणात दूषित पाणी पुरवठा होत असल्याने काविळीबरोबरच अतिसार, उलट्या, जुलाब, थंडी तापाचीही लागण अनेकांना होत असल्याचे दिसून येत आहे. मुळातच कृष्णा नदीचे दूषित पाण्याचे प्रदूषण जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न सतावणार आहे.  

दरम्यान विलासपूरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराने गटर बांधकामासाठी खड्डा खोदला. त्याच ठिकाणी या परिसराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी असून गटाराचे दूषित पाणी त्यात मिसळत असल्याने विलासपूरमध्ये अनेक जणांना काविळीची लागण झाली आहे. यास सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असून रस्त्याच्या कडेचे मंजूर गटर काम संबंधित विभागाने तातडीने सुरु करावे, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.  वरील परिसरात काविळीची लागण झपाट्याने वाढत असल्याने रुग्णसंख्येत वाढ होत असून तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांनी या परिसरात आरोग्य केंद्रामार्फत वैद्यकीय तपासणी तातडीने हाती घ्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

Tags :  kavil patient, Vilaspur, Sambhajinagar, satara, satara news


  •