Wed, Feb 26, 2020 20:55होमपेज › Satara › मी तुरुंगात गेलो तर आश्‍चर्य नको

मी तुरुंगात गेलो तर आश्‍चर्य नको

Published On: Sep 30 2019 1:53AM | Last Updated: Sep 29 2019 11:29PM
कराड : प्रतिनिधी

भाजपकडून साम, दाम, दंड, भेद ही नीती वापरली जात असल्याचे सांगत खा. शरद पवार यांच्यावर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईवरून भाजपवर माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी जोरदार टीका केली आहे. 11 हजार कोटींच्या ठेवी असलेल्या बँकेंत 25 हजार कोटींचा घोटाळा कसा काय होऊ शकतो? असा प्रश्‍न उपस्थित करीत 25 हजार कोटींच्या भ्रष्टाचारांचे पुरावे जनतेला दाखवा, असे आव्हान आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस मेळाव्यात बोलताना राज्य शासनासह केंद्र सरकारवर आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी जोरदार टीका केली. 2008 साली तत्कालीन केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी अधिकार्‍यांच्या सल्ल्यानुसार निर्णय घेतला होता. 2014 साली त्या निर्णयात चुकीचे झाल्याची कुजबूज सुरू झाली आणि 2016 याप्रकरणी आरोपपत्र दाखल झाले. यात चिदंबरम यांचे नाव नव्हते, असा दावा करत 2019 साली निवडणुकीच्या तोंडावर त्यांना अटक करण्यात आली.

त्यांना तुरूंगात सतरंजीवर झोपायला भाग पाडले जाते. डाळ नसलेली आमटी खायला दिली जाते. चपात्याही खाण्यायोग्य नसतात. त्यांना जामिनही मिळू दिला जात नाही. ते काय देश सोडून पळून जाणार आहेत का ? ते काय खुनी आहेत का? असे प्रश्‍न उपस्थित करत पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपावर टीका केली. तसेच कर्नाटकचे डी. के. शिवकुमार यांच्यासह अन्य नेत्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. कराडात अविनाश मोहिते यांनाही चार महिने तुरुंगात काढावे लागले, असे सांगत पृथ्वीराज चव्हाण  यांनी भाजपावर जोरदार टीका केली.

खा. शरद पवार यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईवर भाष्य करताना पोलिसांनी न्यायालयात 11 हजार कोटींच्या राज्य बॅकेंच्या ठेवी असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे 25 हजार कोटींचा घोटाळा कसा होऊ शकतो? असा प्रश्‍न उपस्थित केला. भाजपाकडून कोणाला पद, कोणाला सन्मान, कोणाला कारवाईची भीती दाखवली जात असून मुख्यमंत्री साम, दाम, दंड आणि भेद ही निती वापरत आहेत. त्यामुळेच कदाचित मलाही तुरूंगात जावे लागले तर आश्‍चर्य वाटणार नाही. मी तुरूंगात वाचण्यासाठी पुस्तके आणा असे सांगूनही ठेवले आहे, असा उपरोधिक टोला लगावत आपल्यावरही ईडीकडून कारवाई होऊ शकते, अशी भीतीही आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.