Fri, Jun 05, 2020 11:33होमपेज › Satara › काय करू? मुंबई की दिल्ली 

काय करू? मुंबई की दिल्ली 

Published On: Sep 30 2019 1:53AM | Last Updated: Sep 29 2019 11:23PM
सातारा : सतिश मोरे

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिणेतून विधानसभा निवडणूक लढवावी की बदलत्या परिस्थितीत सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, यावर पृथ्वीराज चव्हाण भूमिका स्पष्ट करू शकले नाहीत. मात्र, आजच्या मेळाव्यात त्यांची देहबोली, त्यांच्या बोलण्यातील आक्रमकपणा आणि ईडीने केलेल्या कारवाईबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची घेतलेली बाजू यामुळे लोकसभेबाबत ते इच्छुक असल्याचे दिसले. मात्र दक्षिणेतूनच उमेदवारी करावी, आम्हाला वार्‍यावर सोडून जाऊ नका, असा कार्यकर्त्यांनी केलेला आग्रह आणि मेळाव्याला मिळालेला फार मोठा प्रतिसाद यावरून आ. पृथ्वीराज चव्हाण लोकसभा पोटनिवडणूक लढण्यास इच्छुक दिसत नाहीत.

मात्र दिल्लीमध्ये झालेल्या घडामोडीनंतर काँग्रेसला दिल्लीत हवा असलेल्या भक्कम पर्यायाचा विचार करून सुप्रिमोंनी त्यांच्याकडून व्यक्त केलेल्या अपेक्षा या पृथ्वीराज चव्हाण यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होत्या. मी दोन दिवसानंतर निर्णय घेतो, असे सांगून पृथ्वीराज चव्हाण यांनी आजची वेळ मारून नेली, असली तरी माझी इच्छा नाही’ या त्यांच्या वाक्यावरून ते दक्षिणमधून विधानसभा निवडणूक लढणार, अशी शक्यता नाकारता येत नाही. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी करणार यादृष्टीने गेल्या वर्षभरापासून आ. चव्हाण यांनी मतदारसंघात संपर्क ठेवला होता. मात्र अधूनमधून ते पुणे लोकसभा मतदारसंघातून किंवा इतर ठिकाणी उभे राहणार असल्याच्या बातम्या येत होत्या.

सातारा जिल्ह्यात काँग्रेसचा बालेकिल्ला असणार्‍या कराड दक्षिणमध्ये विलासराव पाटील-उंडाळकर आणि चव्हाण गटाचे हाडवैर सर्वांनाच माहिती आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी दक्षिण मतदारसंघातून गतवेळी विलासराव पाटील-उंडाळकर यांचा पराभव केला होता. उंडाळकर हे 2014  मध्ये या मतदारसंघाचे आमदार असले, तरी त्यांना डावलून काँग्रेसने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना तिकीट दिले होते. त्यानंतर या दोन्ही गटात दुरावा वाढत गेला. मात्र मलकापूर नगरपालिका निवडणुकीत हे दोन्ही गट एकत्र येऊन निवडणूक जिंकल्यानंतर काका - बाबांचे सुद्धा मनोमिलन होईल, अशा चर्चा सुरू झाल्या.

मात्र कराड दक्षिण मतदारसंघ कुणी लढायचा ? या विषयावर हे मनोमिलन येऊन थांबत होते. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्लीचे राजकारण करावे व माझा मतदारसंघ मला पुन्हा द्यावा, अशी उंडाळकर यांची अपेक्षा होती. तर चव्हाण यांनी  लोकसभेत काँग्रेसची अवस्था आणि राज्यातील त्यांचे वाढते वजन, याचा विचार करून दक्षिणमध्ये उभे राहणार असल्याचे वेळोवेळी सांगितले होते. त्यामुळे मनोमिलनाची गाडी पुढे जात नव्हती.

दहा दिवसापूर्वी सातारचे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी लोकसभा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला आणि त्यानंतर सातारा जिल्ह्यातील राजकीय गणिते बदलली. जिल्ह्यात राष्ट्रवादीला बसलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का होता.राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सातारा दौर्‍यानंतर जिल्हा राष्ट्रवादी कशीबशी सावरली. मात्र उदयनराजेंच्या विरोधात राष्ट्रवादीमधून कोणाला उभे करायचे ? याबाबत राष्ट्रवादीमध्ये तेवढा वजनदार व्यक्ती नसल्यामुळे अडचण होती. माजी खासदार श्रीनिवास पाटील यांचे नाव अनेकदा पुढे आले.

मात्र आजारपण व वय याचा विचार करून त्यांच्या ऐवजी दुसरे नाव पुढे दुसरे नाव द्यावे असा आग्रह होता. दरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा लोकसभेची निवडणूक लढवावी, असा आग्रह शरद पवार यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे केल्याच्या बातम्या येत राहिल्या. याबाबत खुलासा करताना पृथ्वीराज चव्हाण यांनी मी दक्षिणमधून उभारणार असे स्पष्ट केले. सातारा लोकसभा निवडणूक शरद पवार यांनीच लढवावी असा सल्ला त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला. या घडामोडी दरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांना दिल्लीला बोलावण्यात आले. खा. शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर पृथ्वीराज चव्हाण यांना दिल्लीमध्ये बोलावून सातारा लोकसभेबाबत विचारविनिमय झाला. या चर्चेनंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी गेली चार दिवस प्रसारमाध्यमांशी बोलायचे टाळले होते.

सातारा लोकसभा मतदारसंघातून उभे रहायचे की दक्षिणमधून याबाबत  चव्हाण यांच्या मनात साशंकता होतीच, तर मतदारसंघात उत्सुकता होती. लोकसभा मतदारसंघातून उभे राहायचे तर सहा विधानसभा मतदारसंघात कराड दक्षिण वगळता फार मोठे नेटवर्क राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नसल्याने आणि या लोकसभेसाठी उभे राहताना  राष्ट्रवादी काँग्रेसच्या जीवावरच उभे राहण्याचे वेळ त्यांच्यावर येणार होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि इतर लोकप्रतिनिधी पृथ्वीराज चव्हाण यांचे मनापासून काम करणार का?आणि खरंच आपल्याला हा मतदारसंघ सुरक्षित आहे का ? या विषयावर आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे विचार मंथन सुरू होते. उदयनराजे भोसले यांच्या विरोधात निर्माण झालेल्या असंतोषाचा फायदा मिळून पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या अभ्यासू  लोकप्रतिनिधीला जनता विचारात घेईल, असा संदेश पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंत पोहोचला होता.

उदयनराजे यांना पराभूत करायचे असेल तर पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा सक्षम दुसरा पर्याय नाही, असेही चर्चा राष्ट्रवादीच्या गोटातून सोनिया गांधी यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम झाले. मात्र याच काळात राष्ट्रवादीच्या कराड उत्तर, कोरेगाव, वाई मधील कोणत्याही आमदारांनी पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव घेतले नाही. तसेसच राष्ट्रवादी व पृथ्वीराज चव्हाण यांचीही कसली चर्चा झाली नाही. मात्र दिल्लीहून सतत पृथ्वीराज चव्हाण हे सातारा लोकसभा मतदारसंघात उभे राहणार अशा चर्चा होत गेल्या. त्यामुळे कराड दक्षिण मधील पृथ्वीराज चव्हाण यांचे कार्यकर्ते संभ्रमात होते. 

दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाण हे सातारमध्ये उभे राहिले, तर कराड दक्षिण मतदारसंघ आपोआप विलासराव पाटील-उंडाळकर यांच्याकडे जाईल आणि उंडाळकर गट आ. चव्हाण यांना मदत करेल. उंडाळकर गटाचा प्रभाव पाटण, कराड उत्तर मतदारसंघात असल्यामुळे राष्ट्रवादीला याचाही फायदा होऊ शकतो. पृथ्वीराज चव्हाण सातारा लोकसभा मतदारसंघात उभे राहिले तर कराड दक्षिण मतदारसंघात आपले कसे होणार ? गट विस्कळित होणार का ? या चिंतेने त्यांच्या गटातील कार्यकर्ते गेल्या चार दिवसांपासून पूर्ण डिस्टर्ब होते. या पार्श्‍वभूमीवर रविवारी झालेल्या कमिटीच्या मेळाव्यात बहुतांश कार्यकर्त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांनी दक्षिणमधूनच उभे राहावे, असा आग्रह धरला.

कार्यकर्त्यांनी या मेळाव्यात केलेला जल्लोष आणि व्यक्त केलेली कृतज्ञता यामुळे पृथ्वीराज चव्हाण हे भारावून गेले. गेली तीन दिवस दिल्लीमध्ये झालेल्या चर्चेनंतर पृथ्वीराज चव्हाण यांचे मत लोकसभा निवडणूक लढण्यापर्यंत नक्की झाले होते. मात्र कार्यकर्त्यांच्या भावना पाहून त्यांनी मी कराडकरांना न विचारता कुठलाही निर्णय घेणार नाही, असा सूचक संदेश दिला. दोन दिवसात सर्व भूमिका जाहीर करू असे त्यांनी सांगितले. आ. चव्हाण यांची आजच्या मेळाव्यात असणारी देहबोली पहिली तर त्यांना दिल्लीमध्ये जाण्याची खूप इच्छा आहे, असे दिसते.

सातारा लोकसभा मतदारसंघात विजयी होण्याचा मार्ग राष्ट्रवादीच्या सहकार्यातून पुढे जातो. राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी झटून काम केले, तर हा विजय त्यांच्यासाठी फार अवघड नाही.  मात्र कराड दक्षिण मतदारसंघातील कार्यकर्त्यांना वार्‍यावर सोडून जायचे का ? एवढ्या जिद्दीने गेल्या नऊ वर्षापासून बांधलेला गट असा सोडायचा का ? असे प्रश्‍न त्यांच्यासमोर आहेत. देशभर राष्ट्रीय काँग्रेसची अवस्था फार दयनीय आहे. लोकसभा निवडणुकीतील मोठ्या पराभवानंतर काँग्रेस पक्ष अजूनही त्या धक्क्यातून सावरलेला नाही.

या पार्श्‍वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाची दिल्लीमध्ये गरज आहे. याशिवाय जिल्हा काँग्रेसमधील मतभेदही मिटणार आहेत. त्यामुळेच पृथ्वीराज चव्हाण हे लोकसभा निवडणुकीत उतरल्यास विलासराव पाटील उंडाळकर यांनी स्वतः विधानसभा निवडणूक लढवावी, याबाबतही चर्चा झाल्याचे समजते. त्यामुळेच आता काँग्रेस आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्यासह जिल्हावासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.