Thu, Jul 18, 2019 20:45होमपेज › Satara › झाडे तोडणार्‍यांचे कराडात स्वागतच..!

झाडे तोडणार्‍यांचे कराडात स्वागतच..!

Published On: Apr 24 2018 10:30PM | Last Updated: Apr 24 2018 8:38PMकराड : अमोल चव्हाण

कोणीही येतो आणि कराड शहरात वृक्ष तोड करतो. येथे कोणाचा कोणाला ताळमेळच नाही. शहरात वृक्षतोड सुुरु असताना मला त्याच्याशी काहीही देणे-घेणे नाही, असा समज शहरातील नागरिकांचा झाल्यानेच रस्त्यालगतची झाडे राजरोसपणे तोडली जात असतात. याची थोडीसुध्दा कल्पना नगरपालिकेला किंवा वृक्ष संवर्धन समितीला मिळू नये याचे विशेष वाटते. शहरात होत असलेली वृक्षतोड एखाद्या पर्यावरणप्रेमींच्या लक्षात येईपर्यंत परिसरातील बहुतांशी वृक्षांची कत्तल झालेली असते. त्यानंतर मग वृक्ष संवर्धन समिती व नगरपालिकेच्या अधिकार्‍यांची पळापळ सुरु होते. ‘झाडे लावा झाडे जगवा’, असा संदेश देत पर्यावरण रक्षणासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न केले जातात. त्यासाठी शासनाच्यावतीने अद्यादेश काढून सर्व शासकीय यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था तसेच संघटना व नागरिकांना त्यामध्ये सहभागी करून घेतले जाते. यंदा तर राज्यशासनाच्यावतीने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संपूर्ण राज्यात 13 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. त्यासाठी शासकीय पातळीवर त्याची जोरात तयारी सुरु असल्याचे दिसून येत आहे. 

एका बाजूला शासन वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न करत असताना कराडमध्ये मात्र, शासनाच्या या निर्णयाला सोयीस्करपणे तिलांजली दिली जात असल्याचे दिसून येत आहे. कोणीही येता आणि वृक्ष तोड करतो. ही फार गंभीर बाब आहे. दोन दिवसापूर्वी तर कहरच झाला. कराड-तासगाव रस्त्यालगत असलेल्या झाडांची तोड करण्याचा परवाना घेतला आहे, असे सांगत ठेकेदारांने शहरातील भेदा चौकापासून पुढे कार्वे नाकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसेल त्या झाडाची कत्तल करण्याचा सपाटा लावला होता. दिवसभरात मार्केट यार्डपर्यंतची सर्व झाडे आडवी केली होती. पंरतु, कोणीही त्याला विरोध केला नाही की झाडे तोडणार्‍या कामगारांना जाब विचारण्याचे धाडस झाले नाही. नाही म्हणायला काहींनी विचारण्याचा प्रयत्न केला असता ठेकेदाराच्या मुकादमाने आम्ही परवानगी घेतली असल्याचे सांगत त्यांना शांत केले. 

पर्यावरणप्रेमी  रोहन भाटे व संजय शिंदे यांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेत वृक्षतोड थांबविली. संबंधित ठेकेदाराला त्याने घेतलेल्या परवानगीची कागदपत्रे मागितली असता त्याच्याकडे फक्त वनविभागाने कराड-तासगाव रस्त्यालगतची झाडे तोडण्याची परवानगी असल्याचे दाखविले. असे असले तरी शहरातील रस्ता व रस्त्यालगतची झाडे ही नगरपालिकेच्या हद्दीत असून त्यासाठी नगरपालिकेची परवानगी घेणे गरजेचे होते. मात्र, नगरपालिकेची कोणतिही परवानगी न घेता झाडांची तोड केली जात होती.  ही बाब लक्षात आल्यानंतर रोहन भाटे यांनी वृक्ष संवर्धन समितीमधील सदस्यांना फोनवरून याची माहिती देऊन त्यांना घटनास्थळी बोलवून घेतले. त्यानंतर समितीने  नगरपालिकेच्या अधिकार्‍यांशी चर्चा करून विनापरवाना वृक्ष तोड करणार्‍यावर गुन्हा दाखल करण्यास पालिकेला भाग पाडले.

कार्वे रस्त्यालगत वृक्ष तोड झाल्याची घटना ताजी असली तरी अशा वृक्षतोडीच्या घटना कराडमध्ये काही नव्या नाहीत. कोल्हापूर नाक्यावर तर वृक्षतोडीबाबतचे प्रकरण भांडणापर्यंत गेले होते. प्रीतिसंगमावरही काही दिवसांपुर्वी वृक्षतोड झाली होती.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात तर कोणतिही अडचण होत नसताना झाडांच्या फांदा छाटण्यात आल्या होत्या. त्यावेळी वृक्षपे्रमींनी त्याला अटकाव केल्याने तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे वृक्षतोडीच्या घटना शहरात वारंवार घडत असतात, हे नव्याने सांगण्याची गरज नाही.  

तरीही प्रत्येकवर्षी शहरात वृक्ष लागवड केली जाते. मात्र, आजपर्यंत शहरातील वृक्षांची संख्या काही फारशी वाढल्याचे दिसून येत नाही. पुर्वी केंव्हातरी काढलेल्या खड्ड्यांचा वापर दरवर्षी नवीन वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट पुर्ण करण्यासाठी केला जात असल्याचे दिसून येत आहे. हे थांबले नाही तर एक दिवस कराड शहर ओसाड व भकास झाल्याशिवाय राहणार नाही. यासाठी प्रत्येक कराडकरांनी वृक्ष लागवड करून त्याची काळजी घेण्याबरोबरच वृक्ष तोड रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.