Sat, Mar 23, 2019 18:09होमपेज › Satara › दुर्दैवी स्वप्नीलचा मृतदेह मिळाला

दुर्दैवी स्वप्नीलचा मृतदेह मिळाला

Published On: Mar 22 2018 10:41PM | Last Updated: Mar 22 2018 10:25PMकराड : प्रतिनिधी 

मंगळवारी सायंकाळी पोहणे शिकत असताना शिरगाव (ता. कराड) येथे तारळी नदीत बुडालेल्या स्वप्नील बाचल या मुलाचा मतृदेह जवळपास 38 तासांनी नदीलगतच्या स्मशानभूमी परिसरात गुरूवारी सकाळी मिळून आला. त्यामुळे मंगळवार सायंकाळपासून सुरू असणारी शोध मोहिम थांबण्यात आली आहे.  

मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास प्रवीण बाचल हे आपला 10 वर्षाचा मुलगा स्वप्नील याला तारळी नदीत पोहणे शिकवत होते. यावेळी अचानकपणे स्वप्नील बुडू लागल्याने त्याला वाचवण्यासाठी प्रवीण बाचल यांनी नदीत उडी घेत स्वप्नील याला पकडले. मात्र स्वप्नीलने भितीपोटी प्रवीण यांना पकडल्याने ते दोघेही नदीत बुडाले होते.

या घटनेची माहिती मिळताच मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजल्यापासून ग्रामस्थांनी शोध मोहिम राबवण्यास सुरूवात केली होती. त्यानंतर बुधवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास प्रवीण बाचल यांचा मृतदेह नदी पात्रात शिरगाव गावठाण परिसरात आढळून आला होता. मात्र स्वप्नील याचा मृतदेह मिळाला नसल्याने ग्रामस्थांसह युवकांकडून नदी पात्रात बुधवारी सायंकाळी साडेसातपर्यंत शोध मोहिम सुरू होती.मात्र या मोहिमेला यश आले नव्हते. त्यामुळे गुरूवारी सकाळी पुन्हा शोधमोहिम हाती घेण्यात आली. सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास स्माशनभूमी परिसरातील नदी पात्रात स्वप्नील याचा मृतदेह मिळून आला. त्यानंतर कायदेशीर सोपस्कर पूर्ण करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येऊन नातेवाईकांच्या हवाली केल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.