होमपेज › Satara › शेतकऱ्यांसाठी बळीराजा-स्वाभिमानी एकत्र

शेतकऱ्यांसाठी बळीराजा-स्वाभिमानी एकत्र

Published On: Feb 02 2018 11:15AM | Last Updated: Feb 02 2018 11:15AMकराड : प्रतिनिधी 

गेल्‍या तीन दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि बळीराजा शेतकरी संघटनांनी एकत्रित येत कराडमध्ये धुळ्यातील धर्मा पाटील यांना न्याय मिळावा, म्हणून रास्तारोको आंदोलन केले होते. तीन वर्षापूर्वीपर्यत या दोन्ही संघटनांचे कार्यकर्ते स्वाभिमानीच्या झेंड्याखाली एकत्र होते. आता शेतकरी हितासाठी बळीराजाने चर्चेची तरारी दर्शवली आहे. त्यामुळेच बळीराजाने एक पाऊल पुढे टाकले आहे. आता स्वाभिमानीची भूमिका काय असेल? याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. 

खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली 2013 साली कराडमध्ये ऊस दरासाठी तीव्र आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनानंतर पंजाबराव पाटील, सचिन नलवडे, प्रदीप मोहिते, विकास पाटील, देवानंद पाटील यांच्यासह शेकडो बिनीचे शिलेदार स्वाभिमानीच्या झेंड्याखाली एकत्र आल्याने कराड तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला चांगले दिवस आले होते. पर्यायाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांना, अडचणींना वाचा फोडणारे, अन्यायाविरूद्ध लढणाऱ्या कार्यकर्त्याची सक्षम फळी निर्माण झाली होती. 2015 साली प्रदीप मोहिते, देवानंद पाटील यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी कराड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणही केले होते. 

त्‍यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर पंजाबराव पाटील, सांगलीचे बी. जी. पाटील यांच्यासह अनेक लढवय्ये कार्यकर्ते स्वाभिमानीपासून बाजूला गेले आणि या सर्वांनी पंढरपूरमध्ये बळीराजा शेतकरी संघटनेची मुहूर्तमेढ रोवली. या सर्व घडामोडीनंतर आजपर्यंत स्वाभिमानी आणि बळीराजा शेतकरी संघटना आपपल्‍या ताकदीने शेतकरी हितासाठी संघर्ष करत आहेत. मात्र, त्याचवेळी शेतकरी संघटनांमधील दुफळीमुळे विशेषत: स्वाभिमानीच्या फुटीमुळे सातारा, सांगली जिल्ह्यात शेतकरी चळवळीचे फार मोठे नुकसान झाले आहे. बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी चळवळीवेळी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना बाजूला ठेवत काही चुकीचे निर्णय घेतले गेल्याचे सांगितले.
विधानसभा निवडणुकीत जवळपास 17 जणांना स्वाभिमानीने उमेदवारी दिली होती. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर त्यापैकी 15 जणांनी स्वाभिमानीला सोडचिठ्ठी दिली आहे. या सर्व प्रक्रियेमुळे शेतकरी चळवळीला मोठा फटका बसला आणि म्हणूनच आम्ही बाजूला गेलो आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे. मात्र शेतकरी हितासाठी आम्ही आजही चर्चेसाठी प्रसंगी एकत्र येण्यास तयार आहोत, असे स्पष्ट संकेत पंजाबराव पाटील यांनी देत एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यामुळेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांची भूमिका काय असेल ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

लढवय्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नसेल तर शेतकरी हितासाठी आम्ही चर्चेला तयार आहोत. मात्र सर्व सहकाऱ्यांना प्रथम विश्वासात घेणार. 
- पंजाबराव पाटील, अध्यक्ष, बळीराजा शेतकरी संघटना.

दोन्ही संघटना एकत्र आल्यास आनंदच आहे. पण खा. शेट्टी हेच याबाबत निर्णय घेतील आणि त्यांच्या परवानगीशिवाय आम्ही कोणाशीही चर्चा करणार नाही. 
- सचिन नलवडे, सातारा जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना.