Mon, May 20, 2019 18:20होमपेज › Satara › ब्रिटिशकालीन खोडशी धरणासाठी निधीची तरतूद

ब्रिटिशकालीन खोडशी धरणासाठी निधीची तरतूद

Published On: Jan 11 2018 1:09AM | Last Updated: Jan 10 2018 10:34PM

बुकमार्क करा
कराड : प्रतिनिधी

33  वर्षांपासून रखडलेल्या ब्रिटिशकालीन खोडशी बंधार्‍याच्या कामाला सुरूवात झाली असून या कामासाठी 3 कोटी 74  लाखांचा निधी मंजूर झाला आहे. आ. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना या बंधार्‍यासाठी काही निधी देण्यात आला होता. मात्र काम पूर्ण होवू शकले नव्हते. 

या कामासाठी राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने निविदा प्रसिद्ध केली आहे. या कामामुळे परिसरातील शेतीला पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. या बंधार्‍यावरून महामार्गावरून विद्यानगर-सैदापूर येथे जाण्यासाठी छोट्या वाहनांना पर्यायी रस्ता होणार असल्याचेही बोलले जात आहे.

खोडशी धरणाचे काम 80 टक्के पूर्ण झाले असून दरवाजे बसवणे व इतर अनुषंगीक बांधकामे प्रलंबीत आहेत. ही कामे निधीअभावी रखडली होती.   या कामासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी खोडशी धरणासाठी 3 कोटी 74 लाख रुपयांचा निधी मंजूर करुन प्रत्यक्ष निविदा देखील काढल्या आहे. कृष्णा नदीवर जल सिंचनासाठी इंग्रजांनी 1864 साली खोडशी येथे बंधारा बांधला होता. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी 1979  साली 2 कोटी 23 लाख रुपये खोडशी बंधार्‍याच्या कामासाठी मंजूर केले होते. मात्र काम पूर्ण होवू शकले नव्हते.  

खोडशी बंधार्‍यामुळे खोडशी, सैदापूर, वहागाव, नडशी, शिरवडे, तासवडे, बेलवडे, घोणशी, कोपर्डे हवेली  या 16 गावांना पिण्यासाठी व सिंचनासाठी पाण्याचा उपयोग होणार आहे. कृष्णा नदीवर कराड जवळ खोडशी बंधारा आहे. बंधार्‍यासाठी आत्तापर्यंत 21 कोटी 56 लाख रुपये खर्च झाला आहे. आघाडी  शासनाने तीन वेळा निधीची तरतूद केली मात्र तरीही काम अपुरेच राहिले.  तीन कंत्राटदार बदलले गेले. 17  दरवाज्यांपैकी 10  दरवाजे बसवून तयार आहेत. मात्र 7  दरवाजे अजूनही बाकी आहेत. आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी उर्वरीत कामासाठी 27 कोटी 93 लाख रुपयांचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे पाठविला होता. मात्र प्रत्यक्षात 3 कोटी 74 लाख रूपये मंजूर झाले आहेत. या निधीमधूनही बंधार्‍याचे संपूर्ण काम होणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.