Tue, Nov 13, 2018 08:33



होमपेज › Satara › लेखी आश्‍वासनानंतर उपोषण स्थगित

लेखी आश्‍वासनानंतर उपोषण स्थगित

Published On: Jan 21 2018 2:55AM | Last Updated: Jan 20 2018 10:31PM



कराड : प्रतिनिधी 

हिंदू एकताने शुक्रवारी जाहीर केल्याप्र्रमाणे शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कराडमधील दत्त चौकात उपोषणास प्रारंभ केला. त्यानंतर पोलिस व आंदोलकांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याने हिंदू एकता आंदोलन समितीने उपोषण स्थगित केले. 

हिंदू एकता आंदोलन समितीचे प्रांताध्यक्ष तथा कराडचे ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, आचार्य जितेंद्रजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू करण्यात आलेल्या या आंदोलनात कराडसह जिल्ह्यातील शेकडो युवक सहभागी झाले आहेत. 20 आणि 21 जानेवारी अशा दोन दिवशी कराड ते सातारा अशी लव्ह जिहाद जनजागृती पदयात्रा काढण्यात येणार होती. मात्र या पदयात्रेला गुरूवारी सायंकाळी सातारा पोलिस अधीक्षकांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतर शुक्रवारी बैठक घेत हिंदू एकता आंदोलन समितीच्या पदाधिकार्‍यांनी या पदयात्रेला परवानगी मिळावी, म्हणून हे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. 

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर लोकशाही मार्गाने शांततेत उपोषण करण्याची सूचना पावसकर यांनी कार्यकर्त्यांना केली आणि दत्त चौकात उपोषणास प्रारंभ झाला. भिमा कोरेगाव घटनेच्या पार्श्‍वभूमीवर या पदयात्रेला परवानगी नाकारण्यात आली आहे. मात्र पदयात्रेचा कोणत्याही धर्माशी, पक्षाशी संबंध नाही. हिंदू समाजात जनजागृती करणे, हाच आमचा उद्देश आहे. त्यामुळे सामाजिक शांतता प्रस्थापित झाल्यानंतर काही दिवसांनी पदयात्रेला परवानगी मिळाली, तरी चालेल अशी भूमिका हिंदू एकता आंदोलन समितीने घेतली आहे.

दरम्यान, हिंदू एकता आंदोलन समितीकडून पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांनाही निवेदन देण्यात आले आहे. याशिवाय कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून उपअधीक्षकांसह पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव, राजेंंद्र राजमाने यांच्यासह मोठा पोलिस फौजफाटा दत्त चौकासह कराडमध्ये तैनात होता.