Sat, Nov 17, 2018 10:02होमपेज › Satara › कराड : लव्ह जिहाद निषेध पदयात्रेस परवानगी नाकारली

कराड : लव्ह जिहाद निषेध पदयात्रेस परवानगी नाकारली

Published On: Jan 18 2018 8:23PM | Last Updated: Jan 18 2018 8:23PMकराड : प्रतिनिधी

भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात काढण्यात येणाऱ्या लव्ह जिहाद निषेध पदयात्रेस पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी परवानगी नाकारली आहे.
युवतींमध्ये जागृती व्हावी या उद्देशाने हिंदू एकता आंदोलन समितीकडून शनिवार, 20 जानेवारी रोजी कराडमधून साताऱ्यात दोन दिवस निषेध पदयात्रा काढण्यात येणार आहे. शनिवारी सकाळी कराडमधून या रॅलीस प्रारंभ होणार आहे. तर रविवारी सायंकाळी सहा वाजता साताऱ्यातील पोवई नाका येथे या निषेध पदयात्रेचा समारोप होणार आहे. 

भिमा कोरेगाव घटनेने काही दिवसापूर्वी कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच सामाजिक अशांतता निर्माण झाली होती. त्यामुळे या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून लव्ह जिहाद निषेध पदयात्रेस परवानगी नाकारण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. आता पोलिसांनी परवानगी नाकारल्याने विक्रम पावसकर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांची भूमिका काय असेल ? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

लव्ह जिहाद निषेध पदयात्रेस पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर आता भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी प्रसंगी आम्ही उपोषणास बसू, असे संकेत दिले आहेत. 
या संपूर्ण प्रकरणाबाबत दैनिक 'पुढारी'शी बोलताना विक्रम पावसकर म्हणाले, लोकशाही मार्गाने आम्ही हिंदू समाजात जनजागृती व्हावी, यासाठी लव्ह जिहाद निषेध पदयात्रेचे आयोजन केले होते. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारून आमचा हक्क डावलण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या निषेधार्थ उपोषणास बसू, असे संकेत दिले आहेत.

दरम्यान या सर्व घडामोडींबाबत हिंदू एकता आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक होणार असून, यात पुढील दिशा ठरवली जाईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळेच शुक्रवारी हिंदू एकता आंदोलन समितीची भूमिका काय असेल हे स्पष्ट होईल, असे बोलले जात आहे.