Tue, Apr 23, 2019 07:36होमपेज › Satara › जुन्या कोयना पुलाचे काम बंद

जुन्या कोयना पुलाचे काम बंद

Published On: Aug 31 2018 1:43AM | Last Updated: Aug 30 2018 11:47PMकराड : प्रतिनिधी 

येथील कोयना नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाचे काम मोठा गाजावाजा करून सुरू झाले खरे, मात्र दोन महिन्यांतच निधीअभावी ते काम बंद पडले. कामगारही काम सोडून गेले असून, या पुलाच्या नूतनीकरणाचे दहा टक्केही काम अद्याप होऊ शकलेले नाही. 3 कोटी 85 लाख रुपये अंदाजित खर्चाच्या या कामाला सरकारने खो घातल्याने कराडवासीयांनी संताप व्यक्त केला आहे. 

9 जानेवारी रोजी जुन्या कोयना पुलाचे काम सुरू झाले. या कामासाठी 3 कोटी 85 लाखांच्या निधीची तरतूद झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विशेष प्रकल्पामार्फत हे काम केले जात आहे. जानेवारीमध्ये मोठ्या जोशात कामास सुरुवात झाली. पुलावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्ण रोखण्यात आली.     

पिलर्स सिलिंग व ग्राउंटींगचे काम सुरू झाले. पुलावरील जुन्या लोखंडी प्लेट्स बदलण्याबरोबर पिलरच्या चोहो बाजूंनी दिड फुटाने काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. पण ठेकेदाराला वेळेत बिले न मिळाल्याने दोन महिन्यांपासून काम बंद पडले आहे. कामगारही काम सोडून गेले आहेत. एक -दोन कर्मचारी नावापुरते त्या ठिकाणी काही तरी किरकोळ कामे करत आहेत. पण मुख्य कामांला खो बसला आहे. 

याबाबत ठेकेदारांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, वारंवार पत्रव्यवहार करूनही बिले निघाली नाहीत. त्यामुळे काम बंद ठेवण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांचेही या कामाकडे दुर्लक्ष आहे. एक-एक महिना ते कामाच्या ठिकाणी फिरकत नाहीत. कामाची पाहणी करत नाहीत.  सहा वेळा पत्रव्यवहार करूनही त्यांनी बिले काढली नसल्याने काम बंद ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. 

सुरूवातीला या पुलावरील जुन्या सर्व प्लेटा बदलण्याचे नियोजन होते. त्यानुसारच अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. मात्र, काम सुरू झाल्यानंतर जुन्या पण सुस्थितीत असणार्‍या लोखंडी प्लेटा वापरात आणल्या आहेत. ठरावीकच प्लेटा नवीन वापरण्यात आल्या आहेत. हा निर्णय कसा बदलला गेला, याबाबतही नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहेत. दरम्यान, कोयना पुलाच्या दुरूस्थीचे काम सुरू होताच बंद पडल्याने कराडवासीयांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, काम बंद असल्याने नादुरूस्त अवस्थेत असणार्‍या या पुलावरून वारूंजी परिसरातील विद्यार्थी व ग्रामस्थ धोकादायक प्रवास करत आहेत.