Thu, Mar 21, 2019 11:11होमपेज › Satara › संतप्त विद्यार्थिनींचा कराड - चिपळूण मार्गावर रास्‍तारोको

संतप्त विद्यार्थिनींचा कराड - चिपळूण मार्गावर रास्‍तारोको

Published On: Aug 02 2018 5:37PM | Last Updated: Aug 02 2018 5:26PMकराड : प्रतिनिधी 

वसंतगड (ता. कराड, जि. सातारा) येथे सकाळी सात वाजता जादा एसटी सुरू करावी, अशी मागणी करण्यासाठी गेलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थीनींना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एका अधिकाऱ्याने अपशब्द वापरल्याची धक्कादायक घटना गुरुवारी समोर आली. या घटनेमुळे संतप्त विद्यार्थिनींनी कराड - चिपळूण मार्गावर सुमारे चार तास एसटीची वाहतूक पूर्णपणे ठप्प पाडली होती. अखेर संबंधित अधिकाऱ्याने माफी मागितल्यानंतर कराड - चिपळूण मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली.

दरवर्षीप्रमाणे यावेळीही जादा एसटी सुरू करण्याच्या  मागणीसाठी बुधवारी वसंतगड परिसरातील विद्यार्थीनींनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एका अधिकाऱ्याची भेट घेतली. त्यावेळी त्या अधिकाऱ्याने विद्यार्थिनींना अपमानास्पद वागणूक देत अवमानकारक शब्द वापरले. त्यामुळे वसंतगड परिसरातील विद्यार्थीनींनी संतप्त होत आज गुरूवारी सकाळी सहा वाजल्यापासून वसंतगड येथे कराड - चिपळूण मार्गावर ठिय्या मारत केवळ एसटी वाहतूक बंद पाडली. संबंधित अधिकाऱ्याने माफी मागावी अशी मागणी करत सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंतच्या चार तासात एसटी वाहतूक ठप्प करण्यात आली. यामुळे परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. कराड - चिपळूण मार्गावर लांब पल्ल्याच्या एसटी सोडून देत कराड, पाटण तालुक्यातील गावातून येणाऱ्या एसटी रोखण्यात आल्या होत्या. यामुळे प्रवाशांचे हाल झाले. मात्र संबंधित अधिकार्‍याने माफी मागितल्‍याने आंदोलन मागे घेण्यात आले.