होमपेज › Satara › नगराध्यांनी बोलावलेल्या स्थायी सभेबाबत उत्सुकता 

नगराध्यांनी बोलावलेल्या स्थायी सभेबाबत उत्सुकता 

Published On: Dec 06 2017 1:41AM | Last Updated: Dec 05 2017 10:32PM

बुकमार्क करा

कराड  : प्रतिनिधी 

पालिकेच्या सर्वसाधारण सभेत केवळ 3 विषय मंजूर करून उर्वरित विषयांचा निर्णय स्थायी समितीच्या मिटिंगला घेतले जातील असा पवित्रा घेवून जनशक्ती आघाडीने सभा गुंडाळली होती. तसेच उपनगराध्यक्षांना स्थायीची सभा बोलावण्याचा अधिकारी आहे असे सांगून सात दिवसात सभा बोलावणार असल्याचा इशाराही देण्यात आला होता. मात्र दि. 11 रोजी नगराध्यक्षांनीच स्थायीची सभा बोलावली असून या सभेच्या उपस्थितीबाबत जनशक्ती काय भूमिका असणार आहे याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. 

पालिकेत बहुमत असणार्‍या जनशक्तीचे स्थायी समितीत दहा पैकी आठ सदस्य आहेत. जनशक्ती व भाजप यांच्यात निर्माण झालेल्या दुराव्यानंतर नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, भाजपचे स्थायी सदस्य विनायक पावसकर यांनी यापुढे स्थायी सभाच बोलावणार नसल्याची भूमिका घेतली. त्यामागे काही कारणेही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  दि. 15 नोव्हेंबरला बोलावलेल्या स्थायीकडे जनशक्तीच्या सदस्यांनी पाठ फिरवली. त्यानंतर 16 नोव्हेंबरला नगराध्यक्षांना डावलून आझाद चौकातील रस्त्याच्या कामाचा प्रारंभ केला. त्यामुळे नगराध्यक्षांसह भाजपचे नगरसेवकांनी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केल्या. पत्रकार परिषद घेवून विनायक पावसकर यांनी जनशक्तीवर आरोप करत यापुढे स्थायी सभा होणार नसल्याची भूमिका व्यक्त केली. मात्र 22 नोव्हेंबरला नगराध्यक्षांनी बोलावल्या सभेत सर्वसाधारण सभेने स्थायीकडे पाठवलेले विषय पुन्हा स्थायीतच व्हावेत अशी सूचना मांडून सभा गुंडाळण्यात आली. त्याचवेळी जनशक्तीच्या स्थायीच्या आठ पैकी सात सदस्यांनी नगराध्यक्षांना सात दिवसांच्या आत स्थायी सभा बोलवावी अन्यथा कायद्यातील तरतूदीनुसार उपाध्यक्ष सभा बोलावतील असे पत्र दिले. 

जनशक्तीच्या पत्राची 27 नोव्हेंबरला मुदतही संपुष्टात आली. मात्र त्यानंतरही दोघांनीही सभा बोलावली नाही. मात्र नगराध्यक्षांनी 11 डिसेंबरला स्थायी बोलावली असून  जनशक्तीचा सभा बोलावण्याची खेळी व्यर्थ ठरल्याचे दिसून येत आहे. मात्र  नगराध्यक्षांनी बोलावलेल्या सभा कशी होणार ?  जनशक्तीची भूमिका काय राहणार  ? याबाबत उत्सुकता आहे.