Fri, Nov 16, 2018 17:08होमपेज › Satara › मलकापूरमध्ये बिबट्याकडून शेळीसह कोकरू फस्त

मलकापूरमध्ये बिबट्याकडून शेळीसह कोकरू फस्त

Published On: Apr 13 2018 4:25PM | Last Updated: Apr 13 2018 4:25PMकराड : प्रतिनिधी

 मलकापूर (ता. कराड, जि. सातारा) परिसरात गेल्या चार महिन्यांपासून बिबट्याचा वावर असून, गुरूवारी रात्री आगाशिवनगर परिसरातील पवारवस्ती परिसरातील सिताराम हणमंत पवार यांच्या एका शेळीसह चार कोकरांना बिबट्याने फस्त केले. जवळपास दीड महिन्यापूर्वी पवार यांच्या भावाच्या शेळ्यावर बिबट्याने हल्ला केला होता. त्यानंतर पुन्हा ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सुमारे चार महिन्यापूर्वी बिबट्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर मलकापूर विशेषत: आगाशिवनगर परिसरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर दीड महिन्यापूर्वी बिबट्याने पवारवस्तीवरील सिताराम पवार यांच्या भावाच्या शेळ्यांवर हल्ला केला होता. त्यानंतर वनविभागाने बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती. त्यातच गुरूवारी रात्री पवारवस्तीवरील सिताराम पवार यांची एक शेळी तसेच चार कोकरांना बिबट्याने लक्ष्य केले. पवार यांच्या जनावरांच्या गोठ्यालगत ऊस शेती असून, याठिकाणाहूनच बिबट्या आला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेत पवार यांचे सुमारे 50 हजाराहून अधिक रूपयांचे नुकसान झाले असून बिबट्याचा मानवी वस्तीत वावर वाढल्याने या परिसरात दहशत निर्माण झाली आहे.