Wed, Sep 19, 2018 20:20



होमपेज › Satara › कराडातील शिवमंदिरात ‘हर हर महादेव’चा गजर

कराडातील शिवमंदिरात ‘हर हर महादेव’चा गजर

Published On: Feb 12 2018 2:08AM | Last Updated: Feb 11 2018 7:50PM



  •  

 कराड  ; प्रतिभा राजे

देवांचाही देव महादेव म्हणून शिवशंकराची पूजा भक्‍तिभावाने केली जाते. महाशिवरात्री म्हणजे शिवाची आराधना करण्यासाठीचा अतिशय महत्वाचा दिवस. कराडमध्ये संगमेेश्‍वर, हाटकेश्‍वर, कमळेश्‍वर, रूद्रेश्‍वर, कोयनेश्‍वर, सोेमेश्‍वर आदी शिवमंदिरे आहेत. महाशिवरात्रीनिमित्त  मंगळवार, 13 फेब्रुवारीला विविध शिवमंदिरामध्ये कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. महाशिवरात्रीनिमित्त मंदिरामध्ये पूजा, आरती, शिवलिलामृत वाचन. नामजप, लघुरूद्राभिषेक आदी कार्यक्रम केले जाणार आहेत.

तर बुधवार, 14 फेब्रुवारीला महाप्रसाद केला जाणार आहे.  कराडमधील सर्व शिवमंदिरातील गाभार्‍यातील महादेवाची पिंड मन प्रसन्न करून स्फूर्ती देणारी आहे. कृष्णा नदीमध्ये उगमापासून ते उपसागरापर्यंत एकूण 186 तीर्थे आहेत, अशा तिर्थांच्या ठिकाणी कन्यागत स्नान केले जात असल्याचेही सांगितले जाते.

संगमेश्‍वर 

प्र्रीतिसंगमाजवळचे हे प्राचीन मंदिर आहे. या मंदिरात चौमुखी ब्रम्हदेवाची मूर्ती आहे. संपूर्ण भारतात पुष्करतीर्थ, माहुली व कराड या तीनच ठिकाणी अशी मूर्ती आहे.

हाटकेश्‍वर

कराडचे हे ग्रामदैवत आहे. गाभार्‍यातील पिंड पाच फूट उंचीची आहे. या मंदिरात प्रवचने, कीर्तने, पुराणे इत्यादी धार्मिक कार्यक्रम सुरू असतात. 

कमळेश्‍वर

कृष्णाकाठी असणारे प्राचीन शिवमंदिर आहे. हे स्वयंभू शिवाचे मंदिर मानले जाते. पिंड गाभार्‍यात असून, नंदी मात्र एकदम बाहेर आहे. देवळाच्या भोवती तट आहेत.  

रत्नेश्‍वर

1739 साली सरदेशमुखांनी हे मंदिर बांधले आहे. त्याअगोदर त्याठिकाणी एक लहानसे हेमाडपंथी देऊळ आहे. गाभारा व मंडप हे नक्षीदार खांबांनी युक्‍त आहे. 

त्रिबंकेश्‍वर

1734 साली त्र्यंबक दीक्षित उमराणी यांनी बांधले. गाभार्‍यात फक्‍त शिवपिंड असून शिखरात अनेक देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. 

रूद्रेश्‍वर

या पिंडीवर रूद्राक्षासारखी केशरचना असलेला अडीच फूट घेराचा मानवी चेहरा आहे. कृष्णा घाट परिसरातील हे मंदिर लक्षवेधी असेच आहे.  

कोयनेश्‍वर

 कोयनाकाठी घोडे खडक म्हणून मोठा खडक आहे. या खडकावरच हे जुने हेमांडपंती शिवमंदिर आहे. या देवळाचे शिखर व कृष्णा पूल देवळाचे शिखर समुद्रसपाटीपासूनची पातळी एक असावी. त्यामुळे कोयनेश्‍वर देवळाचे शिखर बुडाले की जुन्या कृष्णा पुलावरून पाणी जाते असे समजले जाते.      

सोमेश्‍वर

 पुरातन व जागृत देवस्थान आहे. मंदिरात शंकर, पार्वती, गणेश यांच्या मूर्ती आहेत. महादेवाची शाळुंखी साडेतीन ते पाच फूट उंच असून त्यावर तांब्याच्या नागांच्या फणा दोन फुट उंच आहे. समोर नंदी व कासव आहे. मंदिराचे भव्य शिखर तीस  फूट उंचीचे असून तामिळनाडूमधील रामेश्‍वराचे कलाकार शेरवाई यांनी याचे बांधकाम केले आहे. शिखरावर संतांची व देवादिकांची चित्रे काढण्यात आली  आहेत. शिखरावरील कळस तांब्याचा असून याठिकाणी भाविकांची नेहमीच गर्दी पहावयास मिळते. याशिवाय महाशिवरात्रीलाही विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.  

सदाशिवगड

कराडच्या उत्तरेपासून 5 किलोमीटर अंतरावर असणार्‍या आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सदाशिवगडावर ऐतिहासिक शिवकालीन मंदिर आहे.  विस्तीर्ण पठार असणार्‍या या मंदिराकडे ओगलेवाडी ते हजारमाची गडावर पायरी मार्ग आहे. पायथ्यापासून ते गडावर किमान सुमारे एक हजार पायर्‍या आहेत. सदाशिवगडावर दर सोमवारी, महाशिवरात्रीला भाविकांची गर्दी पहावयास मिळते.  शिवशंभूची ही मंदिरे कराडची शक्‍तिस्थाने आहेत. याशिवाय कराड तालुक्यात अनेक गावात स्वयंभू शिव मंदिरे आहेत. मंदिरात पूजाअर्चा, धुप, दीप यासह धार्मिक विधी केले जातात.