Tue, Feb 19, 2019 14:13होमपेज › Satara › राम कदम यांच्यावर कारवाईची लोकशाही आघाडीची  मागणी

राम कदम यांच्यावर कारवाईची लोकशाही आघाडीची  मागणी

Published On: Sep 06 2018 4:53PM | Last Updated: Sep 06 2018 4:55PMकराड : प्रतिनिधी 

आमदार राम कदम यांनी महाराष्ट्रातील तमाम महिला व  युवतींचा अवमान केला आहे.  त्यामुळे त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाई केली पाहिजे. महिलांचा अवमान करत त्यांनी एक प्रकारे विनयभंग केला असून, विनयभंग केल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कराडमध्ये (जि. सातारा) लोकशाही आघाडीकडून करण्यात आली आहे.

कराडमध्ये गुरुवारी दुपारी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या लोकशाही आघाडीने निवासी नायब तहसीलदार अजित कुऱ्हाडे यांना निवेदन दिले.  या निवेदनात आमदार राम कदम यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला आहे.  अत्यंत किळसवाणी व महिलांना तुच्छतेने वागणूक देणारी त्यांची मानसिकता असून बेजबाबदार वक्तव्य करीत आमदार कदम यांनी एक प्रकारे महिलांचा विनयभंग केला आहे.  अनेक महिला युवतींना एकतर्फी प्रेमाला बळी पडावे लागते. त्यातून अनेक धक्कादायक घटना घडतात.  त्यामुळे आमदार राम कदम यांच्यासारख्या जबाबदार माणसाने युवा पिढीला चांगले आचार विचार देणे गरजेचे आहे.  मात्र प्रत्यक्षात उलट घडत असून, ते आमदार म्हणून काम करण्यास लायक नाहीत.  त्यामुळे त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाई करून विनयभंगाची  तक्रार नोंदवण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

माजी नगरसेविका अरुणा जाधव, विद्यमान नगरसेविका अनिता पवार, पल्लवी पवार, सुनंदा शिंदे,  माजी नगरसेविका पुनम रसाळ,  लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील यांच्या पत्नी डॉक्टर गौरवी पाटील,  माजी नगरसेविका ज्योती बेडेकर,  लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील,  नगरसेवक वैभव हिंगमिरे,  माजी नगरसेवक सुहास पवार, अख्तर आंबेकरी, माजी उपनगराध्यक्ष  नंदकुमार बटाणे,  शिवाजी पवार, जयप्रकाश रसाळ यांच्यासह लोकशाही आघाडीचे आजी -माजी पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.