Mon, Aug 26, 2019 02:26होमपेज › Satara › सांगलीपेक्षा सातार्‍यात दूध दर कमी

सांगलीपेक्षा सातार्‍यात दूध दर कमी

Published On: Jan 12 2018 1:57AM | Last Updated: Jan 11 2018 10:42PM

बुकमार्क करा
कराड : प्रतिनिधी 

सातारा, सांगली जिल्ह्यातील दूध दरातील असलेली तफावत, दूध भेसळ रोखणे यासह विविध विषयांवर शेतकरी संघटना आणि दूध संघांचे प्रतिनिधी यांची मते जाणून घेण्यासाठी तहसीलदार राजेंद्र शेळके यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दुपारी बैठक झाली. या बैठकीत लवकरच जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे.

गेल्या महिन्यात बळीराजा शेतकरी संघटनेने दूध दराबाबत आक्रमक भूमिका घेत शेतकर्‍यांचा मेळावा घेतला होता. तसेच कराड तहसील कार्यालयावर मोर्चा काढत जनआंदोलन उभारण्याचा इशाराही दिला होता. या पार्श्‍वभूमीवर बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, विश्‍वास जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, अनिल घराळ, राजू पाटील, योगेश झिंब्रे यांच्यासह शेतकरी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

सांगली जिल्ह्यातील काही दूध संघ सातारा जिल्ह्यात दूध संकलन करतात. सांगली जिल्ह्यात ते 3.25 फॅटला 24 रूपये दर देतात. मात्र, त्याचवेळी सातारा जिल्ह्यात मात्र ते याच फॅटला 21 रूपये दर देतात. 
त्यामुळे दोन जिल्ह्यात दूध दरात ही तफावत का? असा प्रश्‍न उपस्थित केला.

त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील दूध संघामुळे सातारा जिल्ह्यातील दूध संघही कमी दर देतात, असा दावा यावेळी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी केला. दूध संघांकडूनही आपले म्हणणे मांडण्यात आले. 
यावेळी दूध संघाना वाढीव दर देण्यासाठी 15 जानेवारीची मुदत देण्यात आली आहे. यानंतर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.