Fri, Jul 19, 2019 00:54होमपेज › Satara › गर्भवती महिलेचा पतीकडून खून

गर्भवती महिलेचा पतीकडून खून

Published On: Sep 13 2018 1:47AM | Last Updated: Sep 12 2018 11:27PMकराड : प्रतिनिधी 

गर्भवती महिलेचा संशयास्पद मृत्यू नव्हे, तर तिचा गळा आवळून खून करण्यात आला असल्याचा आरोप संबंधित महिलेची आई व नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी खून झालेल्या महिलेच्या पतीला  कर्नाटकमधून ताब्यात घेऊन अटक केली. दरम्यान, अनैतिक संबंधातून पत्नीचा खून केल्याचा संशय असल्याने त्या दृष्टीने पोलिस तपास करत आहेत.

मोनिका रघू नायक असे खून झालेल्या गर्भवती महिलेचे नाव आहे. याप्रकरणी गिरिजा चेण्णकेशव (रा. कल्लोर, जि. आसण, कर्नाटक) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी रघू ऊर्फ कृष्णनायका नायक (रा. तट्टेळी, जि. आसण, कर्नाटक)   याला अटक केली आहे. चार दिवसापुर्वी मोनिकाचा मृतदेह संशयास्पदरित्या एका खोलीत आढळून आला होता. 

याबाबत पोलिसांनी सांगितले की,  रघु व मोनिका यांनी 2016 मध्ये प्रेमविवाह केला होता. त्यांना नऊ महिन्यांचा एक मुलगा आहे. ते दोघेही कराड येथे राहत होते. मोनिकाचा पती रघु हा रुद्रकुमार अय्यंगर यांच्या बेकरीमध्ये कामास होता. गुरुवार दि. 7 रोजी सकाळी आठच्या सुमारास रघु नायक याने रुद्रकुमार आय्यंगर यांना फोन करून पत्नी मोनिका गर्भवती असून तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असल्याचे सांगितले. त्यानंतर रुद्रकुमार आय्यंगर यांनी बेकरी सुरू केली तेंव्हा रघु नायक राहत असलेल्या रूमला कुलूप दिसले. शनिवारी सकाळी आठच्या सुमारास आय्यंगर यांनी रघुला फोन लावला असता त्याचा फोन बंद लागला. त्यानंतर गॅसची शेगडी आणण्यासाठी आय्यंगर रघु राहत असलेल्या खोलीकडे गेले. खोली बंद असल्याने त्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून खोली उघडली. त्यावेळी खोलीत मोनिका नायक ही मयत अवस्थेत जमिनीवर पडली होती. त्यामुळे रुद्रकुमार आय्यंगर यांनी पोलिसात  धाव घेतली. 

पोलिसांनी केलेल्या चौकशीतून रघुला पत्नी मोनिकाचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. तसेच त्याने मोनिकाचेे इतरांबरोबरचे फोटो पाहिले होते. त्यामुळे अनैतिक संबधातूनच रघुने तिचा गळा कशाने तरी आवळून खून केला, असा आरोप मोनिकाच्या आईने दिलेल्या फिर्यादीत केला आहे. यावरुन पोलिसांनी रघु नायकवर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.