Fri, Aug 23, 2019 21:08होमपेज › Satara › माजी तंत्रशिक्षण संचालकांवरील अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा सुप्रीम कोर्टाकडून रद्द

माजी तंत्रशिक्षण संचालकांवरील अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा सुप्रीम कोर्टाकडून रद्द

Published On: Mar 22 2018 10:41PM | Last Updated: Mar 22 2018 10:35PMकराड : प्रतिनिधी 

राज्याचे  माजी तंत्रशिक्षण संचालक डॉ. सुभाष काशिनाथ महाजन यांच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत दाखल झालेला गुन्हा रद्द करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. कराड येथील शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयातील तत्कालीन भांडारपाल भास्कर गायकवाड यांनी याबाबतचा गुन्हा दाखल केला होता.

गोपनीय अहवालात प्रतिकूल शेरे दिल्याबद्दल तत्कालीन प्राचार्य व विभागप्रमुख डॉ. एस. बी. भिसे व डॉ. के. बी. बुराडे यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास केल्यानंतर पोलिसांनी दोषारोप मंजुरीसाठी ते तंत्रशिक्षण कार्यालयाकडे पाठविले होते. त्यावर तंत्रशिक्षण संचालक महाजन यांनी दोषारोपास परवानगी नाकारली होती. याचा राग मनात धरून गायकवाड यांनी महाजन यांच्यावरच अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता. 

पुणे  येथील  शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्टोअर कीपर भास्कर कारभारी गायकवाड यांनी ही फिर्याद नोंदवल्यानंतर डॉ. महाजन यांना अटकपूर्व जामीन मिळवून गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका केली होती. सरकारी अधिकार्‍याने त्याच्या शासकीय कामाचा भाग म्हणून केलेल्या कृतीस अ‍ॅट्रॉसिटी कायदा लागू होऊ शकत नाही, असा त्यांचा युक्तिवाद होता. उच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळल्यानंतर डॉ. महाजन यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. सर्वोच्च न्यायालयाने 20 मार्च 2018 रोजी हे अपील मंजूर करून महाजन यांच्यावरील गुन्हा रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. 

या खटल्याकामी सातारा येथील अ‍ॅड. अनिल दिनकर पवार व मुंबई उच्च न्यायालयाचे अ‍ॅड. राजाराम बनसोडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे विधितज्ज्ञ एम. वाय. देशमुख यांना सहकार्य केले. ही माहिती अ‍ॅड. दिनकर पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. 

Tags : karad, former, technil education director, astrocist, offense, canceled ,Supreme Court,