होमपेज › Satara › माजी मुख्यमंत्री नारायण राणे शनिवारी कराडमध्ये 

माजी मुख्यमंत्री नारायण राणे शनिवारी कराडमध्ये 

Published On: Dec 06 2017 6:10PM | Last Updated: Dec 06 2017 6:10PM

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी 

राष्ट्रीय काँग्रेससह विधानपरिषद आमदारकीला रामराम करणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे शनिवार, 9 डिसेंबरला कराड दौर्‍यावर येत आहेत. माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण आणि नारायण राणे यांच्यातील मतभेद यापूर्वीही अनेकदा समोर आले होते. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केल्यानंतर ते प्रथमच कराडमध्ये येत असल्याने त्यांच्या या दौर्‍याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

नारायण राणे हे 8 डिसेंबरपासून पश्‍चिम महाराष्ट्र दौर्‍यावर येणार आहेत. 8 व 9 डिसेंबरला कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील विविध कार्यक्रम आटोपून ते शनिवारी दुपारी सांगलीहून कराडला येणार आहेत. दुपारी तीनच्या सुमारास ते आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांना समाधीस्थळी जाऊन अभिवादन करणार आहेत. त्यानंतर ते कराडच्या शासकीय विश्रामगृहात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी कार्यकर्त्यांची मते जाणून घेत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या जिल्ह्यातील पदाधिकारी निवडीबाबत काही महत्त्वपूर्ण निर्णय होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच त्यानंतर ते पत्रकारांशीही संवाद साधणार आहेत. 

दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी नारायण राणे यांचे असलेले मतभेद सर्वश्रुत आहेत. काँग्रेसमध्ये असतानाही अनेकदा नारायण राणे यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जाहीरपणे टिका केली होती. त्यामुळे आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मतदारसंघात येत नारायण राणे काय बोलणार? याबाबत उत्सुकता असून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या दौर्‍याकडे लागून राहिले आहे.