Wed, Jun 26, 2019 11:48होमपेज › Satara › शेतकर्‍यांनो, विकते तेच पिकवा

शेतकर्‍यांनो, विकते तेच पिकवा

Published On: Jan 13 2018 1:15AM | Last Updated: Jan 12 2018 10:14PM

बुकमार्क करा
कराड : प्रतिनिधी

बाजारपेठेचा अभ्यास करून शेतकर्‍यांनी जे विकता येते, ते पिकवावे. आमच्या शेतकर्‍यांची वार्षिक उलाढाल 400 कोटींची आहे. त्यामुळे शेती परवडत नाही, हे सर्वप्रथम डोक्यातून काढून टाका, असे आवाहन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शेतकरी ज्ञानेश्‍वर बोडके यांनी केले.

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखालील बलशाली युवा हद‍्य संमेलनाचे उद्घाटन बोडके यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी इंद्रजीत देशमुख, अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी, कर्‍हाड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव, गटविकास अधिकारी अविनाश फडतरे, सहाय्यक पोलिस आयुक्त आर. आर. नांगरे, शिवम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. शंतनू कुलकर्णी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

ज्ञानेश्‍वर बोडके म्हणाले, राज्यातील शेतकरी दलाल व औषध कंपन्यांच्या विळख्यात सापडला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची अधोगती होत आहे. शेती हा व्यवसाय म्हणून केल्यास आपण मोठे होऊ, हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. रासायनिक खतांमुळे शेतीचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी सेंद्रीय शेतीकडे वळणे आवश्यक आहे. 

परिस्थितीमुळे आपण नोकरी स्विकारली होती. मात्र सांगलीच्या शेतकर्‍याने 10 गुंठ्यात 12 लाख कमवल्याची बातमी वाचली. त्यानंतर मी त्या शेतकर्‍याकडे जाऊन माहिती घेत मी शेती करायचे ठरवले. त्यासाठीचे प्रशिक्षण शेतकर्‍यांकडेच घेतले. पॉली हाऊसची शेती करण्यासाठी 10 लाखांचे कर्ज मिळवण्यासाठी प्रयत्न केले. बँकेच्या अधिकार्‍यांनी साथ दिली. त्यातून माझे पॉलीहाऊस तयार झाले. एका वर्षात मी बँकेचे 10 लाखांचे कर्ज फेडले. बँकेलाही त्याचे आश्‍चर्य वाटले. मात्र त्यासाठी मी व माझ्या कुटुंबाने मोठे कष्ट केले.  त्यानंतर आपण अभिनव हा शेतकर्‍यांचा गट तयार करुन त्यांना ही माहिती दिली. त्यातून मी 25 लाख लोकांचा समूह तयार केला आहे. त्यामुळे शेती परवडत नाही, हे डोक्यातुन काढून टाका, असे आवाहनही बोडके यांनी  केले.