Mon, Mar 18, 2019 19:20होमपेज › Satara › बालकांच्या आहाराचे होतेय ‘कुपोषण’ 

बालकांच्या आहाराचे होतेय ‘कुपोषण’ 

Published On: Jan 13 2018 1:15AM | Last Updated: Jan 12 2018 10:32PM

बुकमार्क करा
कराड : अशोक मोहने  

कुपोषणमुक्‍तीचे ढोल बडवणार्‍या शासनाने अंगणवाडीतील बालकांना पोषण आहार पुरविणार्‍या बचतगटांना गेल्या दहा महिन्यांपासून दमडीही दिलेली नाही. सातारा जिल्ह्यातील  बचतगटांची आहाराची थकीत देणी 4 कोटींच्या घरात गेली आहेत. या जिल्ह्यासह राज्यभर पोषण आहाराचा पुरत फज्जा उडाला आहे.  

सातारा जिल्ह्यात 4 हजार 810 अंगणवाड्या आहेत. यातील कराड तालुक्यात 716 अंगणवाड्या आहेत. त्यामधील 45 हजारांहून अधिक बालकांना पोषण आहार दिला जातो. या सर्व अंगणवाड्यांची आहाराची बिले गेल्या दहा महिन्यांपासून थकली आहेत.

मार्च 2017 पासून एक दमडीही बचतगटांना आहारापोटी मिळालेली नाही. कराड तालुक्यात सरासरी 35 लाख रुपये महिन्याकाठी आहारापोटी देय आहेत. मात्र, निधीच नाही तर बचतगटांची बिले द्यायची कोठून, हा प्रश्‍न बालविकास प्रकल्पासमोर आहे. पर्यवेक्षिका बालकांना चांगला आहार देण्यासाठी बचतगटांच्या मागे तगादा लावत आहेत. मात्र, त्यांची अपेक्षा  पूर्ण करताना बचतगटांची पुरती दमछाक    होत आहे. सेविका व मदतनिसही यात भरडल्या जात आहेत. आहारापासून बालके वंचित राहू नयेत, म्हणून उसनवारी करून आहार देण्याची कसरत बचत गटांकडून सुरू आहे. काही बचतगटांनी कर्जे काढली आहेत तर काहीनी दागिणे गहाण ठेवून आहार सुरू ठेवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.  

दुकानमालकांनी  खाऊचे जिन्नस उधार देणे बंद केल्याचे काही बचत गटांनी सांगितले. तर काही बचत गट आहार बंद करण्याच्या मानसिकतेत आहेत.येत्या पंधरा तारखेपासून आहार बंद करण्याचा त्यांचा विचार आहे.  दरम्यान बालकांच्या कुपोषणाच्या गंभीर प्रश्‍नावर शासन इतके उदासिन कसे याबाबत प्रकल्पामधूनच चिंता व्यक्त होवू लागली आहे.