Fri, Mar 22, 2019 08:19होमपेज › Satara › श्रीनिवास पाटील ठरले ‘पीपल्स गव्हर्नर’

श्रीनिवास पाटील ठरले ‘पीपल्स गव्हर्नर’

Published On: Aug 04 2018 10:28PM | Last Updated: Aug 04 2018 10:02PMकराड : प्रतिनिधी  

सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील हे पीपल्स गव्हर्नर ठरले असून त्यांच्या प्रभावी कार्याचा गौरव सिक्कीम सरकारच्या वतीने करण्यात आला. ‘सिक्कीम अ‍ॅण्ड पिपल्स गव्हर्नर’ या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा प्रवास उलगडला असून या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच सिक्कीम येथे झाले.

 राज्यपाल श्रीनिवास पाटील हे मिळेल त्या संधीचे सोने करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध आहेत. जिल्हाधिकारी व कराड लोकसभा मतदार संघाचे खासदार म्हणून त्यांची कारकीर्द विशेष लोकप्रिय ठरली. सिक्कीम राज्याच्या राज्यपाल पदावर वर्णी लागल्यावर त्यांनी सिक्कीम मध्येही आपल्या कार्याच्या माध्यमातून लोकप्रियता टिकवली.

राज्यपाल पाटील यांनी 20 जुलै 2013 रोजी सिक्कीमचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली होती. पाच वर्षात त्यांनी तेथील जनसामान्यांच्या मनात आपले विशेष स्थान निर्माण केले. राज्यपाल म्हणून कार्यभार संभाळताना सिक्कीम सरकारला त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले, कायद्यांना मंजुरी दिली. सिक्कीमच्या जनतेसाठी व महाराष्ट्र, देशातील पर्यटकांसाठी राजभवनाचे दरवाजे खुले केले. श्रीनिवास पाटील हे सर्वसामान्य माणसात मिसळणारे, सिक्कीम राज्याच्या कानाकोप-यात जाऊन दौरा करणारे, तेथील दुर्गम व बर्फाळ भागात सुध्दा पोहचणारे असे राज्यपाल ठरले. विशेषतः सिक्कीमच्या युवा पिढीला प्रबोधन करत देशाच्या विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी मार्गदर्शन केले. राजभवनातील कर्मचार्‍यांच्या मुलांसाठी त्यांनी वेगळी तरतूद केली. राज्यपाल म्हणून त्यांना व्हीव्हीआयपी, झेड दर्जाची सुरक्षा असताना शासकीय पैशाची बचत व्हावी या हेतूने विमानाने ईकॉनॉमिक क्लासने प्रवास करणारे राज्यपाल म्हणूनही त्यांनी लक्ष वेधले. तसेच त्यांना  विद्यापीठाकडून त्यांच्या प्रदीर्घ प्रशासकीय, राजकीय व सामाजिक सेवेच्या सन्मानार्थ डॉक्टरेट’ ही पदवी बहाल करण्यात आली आहे. राज्यातील जनतेपर्यंत पोहोचणारा जनसामान्यांचा गव्हर्नर म्हणून त्यांनी सिक्कीममधील सामान्य जनमाणसात लोकप्रियता मिळवली आहे. दरम्यान सिक्कीमला देशातील मान्यवर नेत्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर व पर्यटकांना भेट दिली आहे.

राज्यपाल म्हणून श्रीनिवास  पाटील यांनी केलेल्या कार्याचा आढावा सिक्कीम राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाने या पुस्तकाच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकाचे प्रकाशन रजनीदेवी पाटील व टिमा माया चांमलिंग यांच्या हस्ते गंगटोक येथील राजभवनात करण्यात आले. 

कार्यक्रमास सिक्कीमचे मुख्यमंत्री पवन चामलिंग, सभापती के. एन. राय, मानवी संसाधन विकास मंत्री आर. बी. सुब्बा, ग्रामविकास मंत्री एस. बी. सुबेदी, कृषिमंत्री सोमनाथ पौंड्याल, आरोग्य मंत्री अर्जुन घतानी, सारंग पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. पुस्तकात मुख्यमंत्री चामलिंग यांनी राज्यपाल पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.