Sun, Jan 20, 2019 06:55होमपेज › Satara › सातारा पोलिसांचे ठाणे, मुंबईत छापे

सातारा पोलिसांचे ठाणे, मुंबईत छापे

Published On: Jun 21 2018 10:56PM | Last Updated: Jun 21 2018 10:37PMकराड : प्रतिनिधी 

कर्नाटकातील सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षकांचे अपहरण करून साडेचार कोटी लुटणार्‍या संशयितांच्या शोधार्थ सातारा व कराड पोलिसांच्या विविध पथकांनी गुरुवारी पहाटेपासून दिवसभर स्थानिक पोलिसांच्या मदतीने ठाणे, मुंबई, कल्याण परिसरात काही ठिकाणी छापे टाकले. या छाप्यातून महत्त्वपूर्ण माहिती समोर आली असून मुंबईतून एका संशयिताला अटक करण्यात यश आले आहे. 
संजू भीमा सानप ऊर्फ राणे (वय 48, रा. घाटकोपर, मुंंबई) असे त्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी यापूर्वीच ठाण्याचा बडतर्फ पोलिस गजानन तदडीकर, विकासकुमार मिश्रा, महेश भंडारकर आणि दिलीप म्हात्रे, या चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे अटक केलेल्या संशयितांची संख्या पाचवर पोहचली आहे. सानप उर्फ राणे याला शुक्रवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांसमोर हजर केले जाणार असल्याचे पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी सांगितले.

रत्नागिरी पोलिसांच्या मदतीने चौघा संशयितांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांच्याकडे कराड पोलिस कसून चौकशी करत आहेत. तर ठाण्यातील किंग फायनान्स कंपनीचा एजंट संशयित दिलीप म्हात्रे हा वारणानगर (कोल्हापूर) येथील सुभाष पाटील यांच्या ओळखीचा होता. त्यामुळेच याप्रकरणी सुभाष पाटील यांच्याकडून माहिती घेण्याची कार्यवाही गुरूवारी कराड शहर पोलिसांकडून सुरू होती. त्याचबरोबर इंडी (कर्नाटक) येथील ज्ञानयोगी श्री शिवकुमार स्वामीजी शुगर सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक बसवराज चौकीमठ, चेअरमन गिरीश सारवाड, कार्यकारी संचालक सुधीर बिरादार यांच्याकडूनही साडेचार कोटींबाबत माहिती घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

दरम्यान, सातारा गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांच्या नेतृत्वाखालील एक पथक आणि कराड शहर पोलिस ठाण्याचे एक पथक अशी दोन पथके कल्याण, ठाणे, मुंंबई परिसरात संशयितांच्या शोधार्थ बुधवारी रात्रीच रवाना झाली होती. या पथकांनी गुरूवारी पहाटेपासून दिवसभर ठाणे, मुंबई परिसरात काही ठिकाणी छापे टाकले. यावेळी घाटकोपर (मुंबई) येथे संजू सानप उर्फ राणे याला सातारा गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याला सायंकाळी कराडला आणण्यात आले आहे.