Tue, May 21, 2019 22:57होमपेज › Satara › निवृत्त डीवायएसपीचे अपहरण; साडेचार कोटींचा दरोडा

निवृत्त डीवायएसपीचे अपहरण; साडेचार कोटींचा दरोडा

Published On: Jun 20 2018 1:16AM | Last Updated: Jun 20 2018 1:16AMकराड/रत्नागिरी : प्रतिनिधी

पोलिस असल्याचा बनाव करून विजापूर येथील साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकासह अन्य तिघांना बेदम मारहाण करून सुमारे साडेचार कोटी रुपयांच्या रोख रकमेसह निवृत्त पोलिस उपअधीक्षक व अन्य एकाचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी दुपारी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर गोटे (ता. कराड) येथे घडला. 

ऊसतोड मजुरांचे करार करण्यासाठी संबंधित कराड येथे आले असताना ही घटना घडली.  या सिने स्टाईल प्रकारामुळे कराड शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून राज्यभर तपास चक्रे फिरवत रत्नागिरी जिल्ह्यात रोख रकमेसह काही संशयितांना अवघ्या काही तासांत ताब्यात घेतले. याबाबत कारखान्याचे कार्यकारी संचालक सुधीर गुरुगौडा बिरादार यांच्या फिर्यादीवरून अनोळखी आठ ते दहा जणांवर कराड शहर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कर्नाटकमधील हिरेबेन्नूर (ता. इंडी, जि. विजापूर) येथील ज्ञानयोगी स्वामी शिवकुमारजी शुगर कारखान्यास ठाणे येथील किंग फायनान्स कंपनीने सुमारे 172 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले होते. तसेच याच फायनान्स कंपनीबरोबर ऊसतोड व वाहतूक टोळ्यांचा करार करण्यासंदर्भात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारस कराड येथील हॉटेल महिंद्रा एक्झिक्युटिव्ह येथे कारखान्याचे कार्यकारी संचालक सुधीर बिरादार, सुभाष पाटील, दिलीप म्हात्रे, मोहन भाई व निवृत्ती पोलिस उपअधिक्षक चौकीमट आले होते. 

दरम्यान, हॉटेलमधून कराडकडे येत असताना उपमार्गावर गोटे ता. कराडनजीक दोन इनोव्हा कार त्यांच्या गाडीच्या आडव्या मारण्यात आल्या. आठ ते दहा लोक या दोन्ही इनोव्हा कारमधून उतरल्या. त्यांनी कारखान्याच्या पदाधिकार्‍यांना व त्यांच्या सोबत असणार्‍या लोकांना गाडीतून खाली उतरवून आम्ही पोलिस आहे, तुम्ही क्राईम ब्रँचला चला, असे म्हणत काठीने मारहाण केली. त्यानंतर दमदाटी करून त्यांच्याकडील सुमारे साडे चार कोटी रुपयांची रोकड असणार्‍या बॅगा जबरदस्तीने हिसकावून घेवून चौकीमट व अन्य एकास गाडीत घालून हल्लेखोर चिपळूणच्या दिशेने पसार झाले. 
त्यानंतर कारखान्याचे चेअरमन व कार्यकारी संचालक यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात जाऊन घडलेली हकीकत सांगितली.  कराड शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी याबाबत वरिष्ठांना माहिती देऊन तात्काळ सूत्रे हालविली. पोलिसांनी राज्यभर नाकाबंदी केली.

सातारा येथील अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार, पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी तपासाला गती दिली. पोलिस उपाधीक्षक ढवळे यांच्या नेतृत्वाखालील पथक पुढील तपासासाठी रत्नागिरीला रवाना झाले. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्‍वर येथे एका संशयित वाहनाचा अपघात झाल्याचे वृत्त स्थानिक पोलिसांना समजले. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी त्या वाहनाचा पाठलाग करून वाहन ताब्यात घेतले. यावेळी वाहनातील संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीस गेलेली रोखरक्कम हस्तगत करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यांच्याकडील जप्त करण्यात आलेल्या बॅगमधील रक्कमेची खातरजमा करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते.

रत्नागिरीत तिघे संशयित ताब्यात संगमेश्‍वर : वार्ताहर

निवृत्त पोलिस उपनिरीक्षकाचे अपहरण केल्यानंतर पळणार्‍या गाड्यांसह तिघांना संगमेश्‍वर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी 6.45 वा.च्या सुमारास घडली. याबाबत पोलिसांनी गुप्तता पाळली असून, उर्वरित साथीदारांना पकडण्यासाठी जिल्हाभर नाकाबंदी करण्यात आली आहे.

या प्रकरणामध्ये संगमेश्‍वर पोलिसांनी हुंडाई गाडीसह गजानन महादेव तदडीकर (45, रा. बदलापूर), विकास कुमार मिश्रा (30, रा. जोगेश्‍वरी मुंबई), महेश कृष्णा भांडारकर (53) ताब्यात घेतले आहे. संशयितांपैकी दोघेजण इस्टेट एजंट म्हणून काम करतात. कोळंबे येथे ताब्यात घेण्यात आलेली स्कॉर्पिओ गाडी आणण्यासाठी संगमेश्‍वर पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.

तसेच देवरूख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी पाटील यांनीही साडवली सह्याद्रीनगर, मार्लेश्‍वर तिठा, पूर फाटा व मुर्शी चेकनाका या चार महत्वाच्या ठिकाणांबरोबरच अन्यत्र पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला आहे. तिघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत होते.

अपहरण झालेले निवृत्त पोलिस उपाधीक्षक चिपळूण पोलिसात हजर?  

अपहरण करण्यात आलेले निवृत्त पोलिस उपाधीक्षक चौकीमट व अन्य एक हे दोघे चिपळूण पोलिस ठाण्यात हजर झाले असून आम्ही रस्त्यात लघुशंकेला उतरण्याचा बहाणा करून पळून आलो, असे त्यांनी चिपळूण पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे ज्यांनी मारहाण करून त्यांचे अपहरण केले ते या दोघांना मध्येच कसे सोडतील, असा प्रश्‍न उपस्थित झाला असून त्या अनुषंगाने पोलिस तपास करत आहेत.