Mon, Aug 19, 2019 12:05होमपेज › Satara › मराठा भगिनींचा मुंबईत ठिय्या

मराठा भगिनींचा मुंबईत ठिय्या

Published On: Aug 20 2018 12:04AM | Last Updated: Aug 19 2018 11:53PMकराड : प्रतिनिधी 

आंदोलनावेळी मराठा युवकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासह आरक्षण तसेच अन्य मागण्यांसाठी कराडमधील मराठा भगिनी 23 ऑगस्टपासून मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करणार आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या महिला समन्वयकांची कराडमध्ये रविवारी दुपारी बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून राज्यभरातील महिलांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात पहिले महिला ठिय्या आंदोलन 1 ऑगस्टपासून कराडमध्ये सुरू करण्यात आले होते. हे आंदोलन 8 ऑगस्टला स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर मराठा समाजातील युवकांवर आंदोलनावेळी दाखल गुन्हे मागे घेण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र, अद्याप आश्‍वासनाशिवाय काहीच पदरी पडलेले नाही, अशी भावना कराडमधील रविवारच्या बैठकीत मराठा भगिनींनी व्यक्त केली. तसेच आरक्षणासह मराठा समाजाच्या मागण्यांच्या पूर्ततेबाबत केवळ आश्‍वासनच मिळत आहे. गेल्या दोन वर्षांपासून सरकार तसेच विरोधी पक्ष मराठा समाजाच्या बाजूने बोलत आहेत. प्रत्यक्षात काहीच कृती होताना दिसत नाही. त्यामुळे मराठा समाजाच्या भगिनींनी 23 ऑगस्टपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्याचा निर्धार केला आहे. मराठा समाजाच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशाराही मराठा भगिनींनी या बैठकीद्वारे शासनाला दिला आहे.