Thu, Apr 25, 2019 07:30होमपेज › Satara › कराडात ‘सुंदर मी होणार’ मेकअप प्रात्यक्षिकास कस्तुरींचा प्रतिसाद

कराडात ‘सुंदर मी होणार’ मेकअप प्रात्यक्षिकास कस्तुरींचा प्रतिसाद

Published On: Apr 24 2018 10:30PM | Last Updated: Apr 24 2018 8:30PMकराड : प्रतिनिधी

कस्तुरी सदस्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात कराडमध्ये मेकअप सेमिनार पार पडला. बदलत्या काळानुसार प्रत्येक स्त्रीला प्रेझेंटेबल असण्याची गरज वाटते आणि त्यासाठी मेकअप हा अपरिहार्य आहे. सहज आणि कमी वेळात स्वत:चा मेकअप करता यावा. योग्य सौंदर्यप्रसाधनांची निवड करता यावी, यासाठी दैनिक ‘पुढारी’ कस्तुरी क्लबने सभासदांसाठी मेकअप सेमिनारचे नगरपालिका शाळा क्र. 9 मध्ये आयोजन करण्यात आले होते.

ओरिफ्लेमच्या कराड शहराच्या मॅनेजर रेश्मा मिस्त्री यांच्या सहकार्याने हा सेमिनार घेण्यात आला. सुनीता कोळेकर, वृषाली कांबळे, अंजली शहा या ब्युटिशियनच्या मदतीने रेश्मा मिस्त्री यांनी वयानुसार तसेच त्वचेच्या प्रकारानुसार मेकअप प्रात्यक्षिकाद्वारे दाखवले. स्त्रियांनी क्लिनअप दररोज केले पाहिजे, ते घरच्या घरी कसे करावे याचेही प्रात्यक्षिक दाखविले व सोबतच त्वचेची काळजी घेण्याच्याही टिप्स दिल्या. 

बाह्यसौंदर्याबरोबरच आंतरिक सौंदर्य जपण्याचीही तितकीच गरज आहे. ‘सुंदर मी होणार’ या विषयावर बोलताना स्त्रीरोगतज्ञ डॉ. वर्षा देशपांडे यांनी सांगितले. ‘मन चंगा तो सब चंगा’ असे म्हणत निरोगी शरीर व निरोगी मन असणारी प्रत्येक स्त्री सुंदरच असते, असे डॉ. देशपांडे म्हणाल्या.

वाढत्या वयासोबत येणार्‍या समस्यांचे निराकरण वेळच्यावेळी करा, स्वत:च्या आहाराकडे, व्यायामाकडे लक्ष द्या. कुटुंबातील इतर सदस्यांप्रमाणे स्वत:ची काळजी घ्या. प्रत्येक गोष्टीतून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करा. थोडक्यात काय तर ‘सुंदर मी होणार’ हा मूलमंत्र प्रत्येकीने जपा असा सल्ला डॉ. देशपांडे यांनी दिला. महिलांच्या आरोग्यविषयक शंकांचे निरसनही त्यांनी यावेळी केले.

कस्तुरी नावनोंदणीवेळी जाहीर केलेला ‘कृष्णा एन्टरप्रायझेस’ यांच्या ग्लास टॉप गॅस शेगडीचा लकी ड्रॉदेखील यावेळी काढण्यात आला.  यात बीना शहा, डॉ. सुचिता पाटील, कांचन इंगवले, सुनंदा शिंदे या विजेत्या ठरल्या. उपस्थित महिलांमधून 10 जणींना लकी ड्रॉद्वारे रेश्मा मिस्त्री यांच्याकडून ओरिफ्लेम उत्पादने भेट देण्यात आल्या. कृष्णा एन्टरप्रायझेसचे अमर सुर्वे, कैलास थोरात, रेश्मा मिस्त्री, डॉ. वर्षा देशपांडे यांचे स्वागत कस्तुरी ग्रुप लिडर ज्योती कोपर्डे यांनी केले.