Fri, Apr 26, 2019 15:34होमपेज › Satara › कर्मवीरांच्या पहिल्या शाळेचा ‘पाया’ खिळखिळा

कर्मवीरांच्या पहिल्या शाळेचा ‘पाया’ खिळखिळा

Published On: Aug 31 2018 1:43AM | Last Updated: Aug 30 2018 11:39PMकराड : चंद्रजित पाटील

दरवाजे नसलेल्या खिडक्या... पत्रा ठोकलेले दरवाजे... उखडलेल्या फरशा... तडे गेलेल्या धोकादायक भिंती अन् सभोवताली घाणीचे साम्राज्य हे वर्णन वाचून एखाद्या पडक्या घराचे चित्र आपल्यासमोर उभे राहते. मात्र, हे वास्तव एखाद्या शाळेचे असेल, तर धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. त्यातही आज विशाल वटवृक्षांत रूपांतर झालेल्या रयत शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ रोवणार्‍या ऐतिहासिक काले गावातील शाळेची ही भयावह अवस्था पाहून तोंडात बोट गेल्याशिवाय राहात नाही.

सुमारे 99 वर्षांपूर्वी म्हणजेच 4  ऑक्टोबर 1919 रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी काले येथील आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने रयत शिक्षण संस्थेची स्थापना करत संस्थेची पहिली शाळा सुरू केली होती. त्यानंतर 1948 साली शाळेच्या सुमारे 15 ते 16 खोल्यांचे बांधकाम करण्यात आले होते. आज या शाळेत पाचवी ते दहावीपर्यंत सुमारे 900 विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. 1919 नंतर पाच वर्षांनी संस्थेचे कार्यालय सातारा येथे हलवण्यात आले आणि त्यानंतर गेल्या 9 दशकाहून अधिक काळात आज या संस्थेतील विविध शाळा, विद्यालय, महाविद्यालय तसेच अन्य प्रकारच्या शैक्षणिक संस्थामधून सुमारे साडेचार लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यात काले शाळेतील सुमारे 900 विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे.

मात्र सुमारे 70 वर्षापूर्वी बांधलेल्या शाळेच्या खोल्यांची सध्यस्थितीत भयावह अवस्था झाली आहे. शेकडो विद्यार्थी दररोज याच धोकादायक खोल्यांमध्ये शिक्षण घेत आहेत. शाळेच्या व्हरांड्यातील  फरशा उखडल्या आहेत. तर ज्या लाकडी खांबावर शाळेच्या खोल्याचे छत अवलंबून आहे, त्या खांबाचा पाया कुजला असून ते केव्हाही कोसळू शकतात. सात ते आठ खोल्यांचे दरवाजे मोडले असून त्यावर पत्रा ठोकण्यात आला आहे. काही वर्गातील विद्यार्थ्यांना बसण्यासाठीचे बेंचही मोडले आहेत. 

शाळेत प्रवेश केल्यानंतर पुढील बाजूने हे भयावह दृश्य दिसते. मात्र पाठीमागील बाजूला गेल्यावर तर मन सुन्न झाल्याशिवाय राहत नाही. शाळेच्या बहुतांश वर्गांच्या खिडक्यांचे दरवाजेच नाहीत. काही ठिकाणी दरवाजे आहेत, पण त्यांना दरवाजे कसे म्हणायचे ? असा प्रश्‍न तेथे गेल्यावर पडतो. काही खिडक्यांना पत्रा ठोकण्यात आला आहे. तर भरीस भर म्हणून शाळेच्या भिंतीलगत असलेली झाडेझुडपे शाळेच्या पत्र्याला टेकली आहेत. याठिकाणी झालेली अडचण पाहता साप अथवा अन्य प्राणी खिडकीतून आत जाऊन एखाद्या विद्यार्थ्यांला चावला तर त्यास जबाबदार कोण ? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. एकूणच रयत शिक्षण संस्थेच्या पहिल्या शाळेला आज घरघर लागल्याचे दुर्दैवी चित्र समोर आले आहे.