Tue, Jan 22, 2019 11:44होमपेज › Satara › कराड ‘बंद’ची हाक

कराड ‘बंद’ची हाक

Published On: Jun 09 2018 10:55PM | Last Updated: Jun 09 2018 10:44PMकराड : प्रतिनिधी

बळीराजा शेतकरी संघटनेकडून रविवारी कराड बंदचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर सकाळी अकराच्या सुमारास दत्त चौक परिसरात सर्वपक्षीय सभा घेत राज्य शासनासह केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यात येणार असल्याची माहिती बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दिली आहे.

बळीराजा शेतकरी संघटनेकडून गेल्या रविवारी कराडमध्ये प्रीतिसंगम घाटावर कर्जमाफीसह शेतकर्‍यांना दिलेल्या आश्‍वासनांना वर्षपूर्ती होऊनही ही आश्‍वासने न पाळल्याने शासनाचे ‘प्रथम वर्ष श्राद्ध’ घालण्यात आले होते. त्यानंतर तीन दिवसांपूर्वी मलकापूरमध्ये रास्तारोकोही करत मोफत भाजीपाला वाटत शासनाचा निषेध नोंदवला होता. त्याचवेळी शासनाने दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचे स्पष्ट संकेत पंजाबराव पाटील, साजिद मुल्ला यांनी दिले होते. त्यानुसार रविवारी कराड बंद ठेवत शेतकर्‍यांना पाठिंबा देण्याचे आवाहन व्यापार्‍यांना करण्यात आले आहे. त्याचबरोबर सर्वपक्षीय सभा घेत शासनाच्या धोरणांचा निषेधही नोेंदवला जाणार असल्याचे पंजाबराव पाटील यांनी सांगितले आहे.