Mon, Jul 15, 2019 23:40होमपेज › Satara › नोकरीच्या आमिषाने युवकाची फसवणूक

नोकरीच्या आमिषाने युवकाची फसवणूक

Published On: Jan 13 2018 1:15AM | Last Updated: Jan 12 2018 10:39PM

बुकमार्क करा
कराड : प्रतिनिधी

राज्य शासनाच्या विक्रीकर विभागाचा लोगो असलेले लिपिकपदाचे बनावट नियुक्‍तीपत्र देऊन युवकाची 5 लाख 30 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी मलकापूर येथील सिद्धनाथ कन्सल्टन्सी प्रा. लि.चे मालक अनिल कचरे याला पोलिसांनी अटक केली. त्याला शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता, तीन दिवस पोलिस कोठीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. 

सागर संभाजी ताटे (वय 28, रा. धोंडेवाडी, ता. कराड) असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे. सागर ताटे याला नोकरीची गरज असल्याने त्याने मलकापूर येथील ढेबेवाडी फाट्यावरील सिध्दनाथ कन्सल्टन्सीच्या कार्यालयाचे मालक अनिल कचरे याची भेट घेतली. चर्चेनुसार मुंबई येथे जीएसटी भवनमध्ये नोकरीला लावतो, असे सांगत त्यासाठी 10 लाखा रूपये तसेच बनावट टायपिंग प्रमाणपत्र काढण्यासाठी 30 हजार असे 10 लाख 30 हजारांची कचरे याने ताटे याच्याकडे मागणी केली. परंतु, 7 लाख 30 हजारावर त्यांचा व्यवहार ठरला होता. 

24 ऑक्टोबर 2017 रोजी सागर ताटे यांचे वडील संभाजी ताटे, भाऊ संदीप व देवानंद हुलवान यांनी अ‍ॅडव्हान्स म्हणून 3 लाख रुपये रोख दिले. त्यानंतर कचरे याने अमित पाटील नावाच्या व्यक्‍तीस फोन करून जीएसटी भवन मुंबई येथे सागर ताटे याची मुलाखत घेण्यास सांगितले. मुलाखतीनंतर अमित पाटील यांनी सागरकडून टायपिंग प्रमाणपत्रासाठी 30 हजार रुपये रोख घेतले.    

सागर मुंबईमध्येच असताना अनिल कचरेने फोन करून ‘तुझे काम झाले आहे. ऑर्डर काढण्यासाठी 2 लाख रुपये जमा करण्यास सांगितले. त्यानुसार 26 ऑक्टोबर रोजी देवानंद हुलवान यांनी 2 लाख रुपये अनिल कचरेकडे जमा केले. त्यानंतर सीएसटी रेल्वे स्टेशन येथे अनोळखी व्यक्तीने सागरला विक्रीकर विभाग लिपिक पदाचे महाराष्ट्र शासनाचा लोगो असलेले नियुक्‍तीपत्र दिले. 
दरम्यान, हे पत्र बनावट असल्याचे लक्षता आल्यानंतर सागरने संबंधित व्यक्‍तीकडे याबाबत चौकशी केली असता तुम्ही अनिल कचरे यांना भेटा व त्यांनाच काय ते सांगा, असे सांगितले.  
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वारंवार मागणी करूनही अनिल कचरे याला दिलेले 5 लाख 30 हजार रुपये परत न दिल्याने सागरने शहर पोलिसात गुरूवारी रात्री उशिरा फिर्याद दाखल केली.