Thu, Jun 27, 2019 17:45होमपेज › Satara › कण्हेर कालव्याला भगदाड पडण्याचा धोका

कण्हेर कालव्याला भगदाड पडण्याचा धोका

Published On: Jan 09 2018 1:36AM | Last Updated: Jan 08 2018 10:15PM

बुकमार्क करा
खेड : वार्ताहर 

कृष्णा सिंचन विभागांतर्गत असलेल्या कण्हेर डाव्या कालव्याला वाढे ते नेले गावाच्या हद्दीत गळती लागली असून, सुमारे 5 ते 6 क्युसेक पाण्याची नासाडी सुरू झाली आहे. यामुळे कालव्याला कोणत्याही क्षणी भगदाड पडण्याची शक्यता व्यक्‍त केली जात असल्याने लाभ क्षेत्रातील शेतकरी, रहिवासी भीतीच्या छायेत आहेत. याबाबत सिंचन मंडळाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी गांधीगिरीची भूमिका घेेतल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. 

कृष्णा सिंचन विभागांतर्गत कण्हेर डाव्या कालव्यातून कण्हेर व उरमोडी धरणातील पाणी माण, खटाव व सांगलीसाठी सोडण्यात येत असल्याचे समजते. सध्या या कालव्यातून 650 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असून, कालव्यांतर्गत वाढे व नेले गावांच्या हद्दीत 7 कि.मी. स्लॅब ड्रेनला मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे. सुमारे  5 ते 6 क्युसेक पाणी गळतीद्वारे वाया जात असून, दिवसेंदिवस गळतीचे प्रमाणही वाढत चालले असल्याची स्थिती आहे, तर कालव्यानजीकच्या सुमारे 200 मीटरचा भराव पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे खचत चालला असल्याने कोणत्याही क्षणी कालव्याला भगदाड पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

कण्हेर डाव्या कालव्याची कित्येक वर्षांत दुरुस्ती केली नसल्याने कालव्याच्या दोन्ही बाजूंचे भराव खचून ठिकठिकाणी सिमेंटचे अस्तरीकरण ढासळले असल्याने भगदाड पडली आहेत.  गळतीद्वारे वाया जाणार्‍या पाण्याला पर्याय नसल्याचे बिनदिक्‍कतपणे अधिकारी सांगत आहेत.