Tue, Mar 19, 2019 21:02होमपेज › Satara › कासला जाताय... सावधान..!

कासला जाताय... सावधान..!

Published On: Aug 23 2018 1:29AM | Last Updated: Aug 22 2018 11:23PMसातारा : प्रतिनिधी

सातारा-कास मार्गावरील यवतेश्‍वर घाटात  ठिकठिकाणी दरडी कोसळण्याच्या मार्गावर आहेत. काही ठिकाणी छोट्या दरडी कोसळल्या असून मातीचा भरावही रस्त्यावर आला आहे. त्यामुळे ‘पर्यटकहो  कासला जाताय.. सावधान’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे. कास, ठोसेघर परिसरात गेले काही दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. कास पठारावर फुलांचा हंगामही काही दिवसात सुरु होत आहे.  यवतेश्‍वर घाटात ठिकठिकाणी छोट्या छोट्या दरडी कोसळत आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे.  तर अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या मार्गावर आहेत. कोणत्याही क्षणी या दरडी कोसळून मोठी दुर्घटना घडू शकते.

त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या धोकादायक दरडी हटवाव्यात, अशी मागणी वाहनचालकासह पर्यटकांमधून होत आहे. गतवर्षी जोरदार पाऊस असल्याने यवतेश्‍वर घाटात रस्ता खचला होता. यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. यामुळे कास पुष्पपठार पाहण्याचा अनेक पर्यटकांचा आनंद हिरावला गेला होता. तर मेढामार्गे कासला वाहतूक वळवण्यात आली होती. त्यामुळे अनेक पर्यटकांना फुले पाहण्यास मिळाली नाहीत. त्यातच जर दरडी कोसळल्या तर यावर्षीही पर्यटकांचा फुले बघण्याचा आनंद हिरावला जाणार का अशा प्रश्‍न पडला आहे.