Fri, Jul 19, 2019 05:53होमपेज › Satara › पिरवाडीत काविळीची साथ

पिरवाडीत काविळीची साथ

Published On: Apr 12 2018 1:18AM | Last Updated: Apr 11 2018 11:39PMखेड : वार्ताहर

जिल्हा परिषदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पिरवाडी गावात जीवन प्राधिकरणाच्या दूषित पाण्यामुळे काविळीची साथ फैलावली असून, आरोग्य पथकाने केलेल्या तपासणीत सुमारे 19 ग्रामस्थांना काविळीची लागण झाल्याचे निष्पन्‍न झाले. सुमारे 37 ग्रामस्थ कावीळसद‍ृश स्थितीत आढलेले असून, यामध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्‍त केली जात आहे. दरम्यान, या पार्श्‍वभूमीवर आरोग्य यंत्रणा अ‍ॅलर्ट झाली असून, पिरवाडीत तपासणी विभाग सुरू करून ग्रामस्थांना औषधोपचार सुरू केला आहे. 

खेड (ता. सातारा) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पिरवाडी गावाला जोडणार्‍या अरुंद रस्त्यालगत उघड्या गटारातून जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिन्या गेल्या आहेत. गटारातील सांडपाणी जलवाहिन्यांमध्ये मिसळत असल्याने पाणी दूषित होत आहे.  ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर प्रशासनाने आरोग्य केंद्रांना सर्व्हे करण्याच्या सूचना दिल्याच्या पार्श्‍वभूमीवर अतिरिक्‍त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विनीत फाळके यांनी गावाला भेट देवून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कारखानीस यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचणेर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत सुतार, डॉ. अहिरे यांच्यासह चिंचणेर प्राथमिक आरोग्य केंद्राचे 20 आरोग्य सेवक, सेविका, आशा स्वयंसेविका यांचे पथक तयार करण्यात आले.

या पथकाने पिरवाडीतील सुमारे 309 घरांचा सर्व्हे करुन सुमारे 1262 ग्रामस्थांची तपासणी केली. या तपासणीत 19 ग्रामस्थांना काविळीची लागण झाल्याचे निष्पन्‍न झाले असून 37 संशयित रुग्ण आढळले आहेत. गावातील 18 रुग्णांचे रक्‍त तपासणीसाठी नमुने घेतले आहेत. तर 9 ठिकाणचे पाणी नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. आरोग्य विभागाने दोन ठिकाणच्या जलवाहिन्या व व्हॉल्व बदल्यासाठी जीवन प्राधिकरणाला पत्र दिले असून 67 रुग्णांना औषधोपचार केला आहे. आरोग्य पथकाने काविळीबरोबरच अतिसार, उलट्या, जुलाब, थंडी तापाची लागण झालेल्या रुग्णांचीही तपासणी मोहीम सुरु केली असून काविळीच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्‍त केली आहे.