Mon, Mar 25, 2019 05:23
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › कारला लावलेला जॅमरच जेव्हा चोरीला जातो

कारला लावलेला जॅमरच जेव्हा चोरीला जातो

Published On: Jun 20 2018 3:13PM | Last Updated: Jun 20 2018 3:13PMसातारा : प्रतिनिधी

सातारा शहराला वाहतुकीची शिस्त लागावी, यासाठी वाहतुक विभाग प्रयत्नशील असतानाच आश्चर्यचकित करणारी घटना घडल्याने सातारा पोलिस दलात या घटनेची खुसखुशीत चर्चा सुरु आहे. नो पार्कींगमध्ये असणार्‍या कारला पोलिसाने जॅमर लावल्यानंतर चक्क त्यावरील चालकाने जॅमरचा टायर काढून स्टेपनी लावून तो जॅमरच चोरी केला असल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे सातार्‍यात ‘अहो आश्चर्यम्‌ दंड टाळण्यासाठी टायरसह जॅमरच चोरीला गेला,’ अशी म्हणण्याची वेळ वाहतुक विभागातील पोलिसांवर आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सातार्‍यातील राधिका रोड येथे भारत गॅस एजन्सी आहे. या परिसरातील काही भाग नो पार्कींग झोन आहे. असे असतानाही दि. 18 रोजी एम एच 11 एल 9749 ही कार नो पार्कींगमध्ये लावण्यात आली होती. वाहतुक विभागाचे एका पोलिसाने कार नो पार्कींगमध्ये असल्याने त्यांनी या कारला जॅमर लावला. बराच वेळ थांबल्यानंतरही कारचा चालक त्याठिकाणी आला नसल्याने पोलिसांनी नेहमीप्रमाणे त्यांचे काम सुरु ठेवले.

सोमवारी सकाळी जॅमर लावल्यानंतर दिवस संपून ड्युटी संपण्याची वेळ आल्याने वाहतुक विभागाचे पोलिस वाहतुक शाखेत हजेरीसाठी एकत्र आले. यावेळी एक जॅमर नसल्याचे निदर्शना आले. पोलिसांनी राधिका रोडवर धाव घेतली मात्र त्याठिकाणी जॅमर लावलेली कार नसल्याचे लक्षात आले. या घटनेने पोलिसांनाही घाम फुटला. वरिष्ठांना या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनीही शोध घेण्याचे आदेश दिले. मंगळवारीही कार व जॅमरचा शोध लागत नसल्याने अखेर शाहूपुरी पोलिस ठाण्यात पोलिस हवालदार राजेंद्र पगडे यांनी याबाबत तक्रार दिली आहे.

दरम्यान, पोलिसांनी लावलेल्या जॅमरचे टायर बदलून दुसरे टायर घालून जॅमरची चोरी झाल्याचे लक्षात आल्याने या घटनेची सातार्‍यात जोरदार चर्चा रंगली आहे.