Tue, Jul 23, 2019 06:17होमपेज › Satara › शिवरायांचे आठवावे रुप... शिवरायांचा आठवावा प्रताप...

शिवरायांचे आठवावे रुप... शिवरायांचा आठवावा प्रताप...

Published On: Feb 20 2018 1:16AM | Last Updated: Feb 19 2018 8:53PMसातारा : सुनील क्षीरसागर

जगामध्ये असंख्य पराक्रमी योध्दे होवून गेले. पण, छ. शिवरायांसारखा सर्वगुणसंपन्न, प्रजाहितदक्ष, पराक्रमी राजा दुसरा कोणताच झाला नाही. सिकंदरला जगजेत्ता राजा म्हटले जाते, फ्रान्सच्या नेपोलियन बोनापार्टाने असंख्य लढाया जिंकल्या असल्या तरी छत्रपती शिवरायांच्या गनिमी काव्याची सर अन्य कोणत्याही युध्दाला नाही, असे अनेक संशोधकांनी म्हटलेले आहे. त्यामुळे  शिवकालाला आज 350 वर्षे उलटूनही छ. शिवरायांच्या नावाचे गारुड आजही कायम असून हजारो वर्षे ते तसेच राहणार आहे.

या जगामध्ये जे जे पराक्रमी राजे होवून गेले त्यांच्या पराक्रमाची नावनिशानी केवळ त्यांच्या चरित्रकारांनी लिहिलेल्या इतिहासातच दिसून येते. पण, राजे छ. शिवरायांचा पराक्रम 350 वर्षे होवूनही त्यांचा उत्सव दरवर्षी एखाद्या सणासारखा साजरा होणे ही अतिदुर्लभ गोष्ट असल्याचे दिसून येते.

दरवर्षी शिवजयंती आली की महाराष्ट्रातील माती हर्षोल्हासाने पुलकीत होते. हजारो नव्हे लाखो युवकांच्या अंगात या शिवजयंतीचा उत्साह सळाळतो आणि क्षत्रीय कुलावंतस, योध्दा, मावळा, मर्द मराठा, एक मराठा लाख मराठा, अशा अंगात उर्जा संचारणार्‍या नावांचा पेहराव करुन हे रणमर्द मावळे अवघ्या महाराष्ट्रातील गडकोटावर छ. शिवराय व त्यांच्या झुंजार सरदारांच्या पराक्रमाला मुजरा करायला जातात.

त्याठिकाणी शिवचरणी माथा टेकवून,  शिवछत्रपतींच्या पराक्रमाने पुलकीत झालेली गडावरील माती आपल्या भाळी लेवून हाती मराठ्यांचा जाज्ज्वल्य पराक्रम  सांगणारी शिवज्योत त्याठिकाणी पेटवून हर हर महादेव....जय भवानी....जय शिवाजी असा जयघोष करत परत फिरतात. शे-दोनशे मैलांचा प्रवास गडापासून पुन्हा आपल्या गावापर्यंत हे युवक शिवज्योती घेऊन धावून करतात.  ज्यावेळी ही शिवज्योत त्यांच्या हातात असते त्यावेळी त्यांना दुसरं काहीच सुचत नाही. केवळ छ. शिवरायांचे रुप, त्यांचा पराक्रम आठवत ....त्यातून पुलकीत होत ...अवघे शिवमय होत ते धावत असतात. त्यामुळेच आज शिवकालाला 350 वर्षे उलटूनही म्हटले जाते की ‘ शिवरायांचे आठवावे रुप....शिवरायांचा आठवावा प्रताप...’