Fri, Jul 19, 2019 05:03होमपेज › Satara › बोपर्डी शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जा

बोपर्डी शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जा

Published On: May 08 2018 1:55AM | Last Updated: May 08 2018 12:54AMसातारा : प्रतिनिधी

राज्य  शासन सुरू करत असलेल्या  आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच जूनमध्ये सुरू करणार आहे. शालेय शिक्षण विभागाने राज्यातील 13 आंतरराष्ट्रीय  शाळांची यादी जाहीर केली असून त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील  बोपर्डी जिल्हा परिषद शाळेचा समावेश आहे. 

राज्यातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्तम शिक्षण देण्यासाठी  स्थानिक स्वराज्य संस्था, आदिवासी विकास विभाग व सामाजिक न्याय विभाग व  शालेय शिक्षण विभागाच्या राज्यातील शाळांमधून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या  100 शाळा निर्माण करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.

राज्य शासनाने पहिल्या टप्प्यात 106 शाळांमधून व 14 जुलै 2017  च्या सरकारी निर्णयानुसार उत्कृष्ट कामगिरी असलेल्या 13 शाळांची निवड प्रत्येक विभागातून करण्यात आली. त्यामध्ये बोपर्डी ता. वाई, बावळेवाडी ता.शिरूर, खानापूर ता. भुदरगड, भोये ता. चांदवड,तोरणामाळ आंतरराष्ट्रीय निवासी शाळा ता. धडगाव, शहीद जानया तिमया ता. गोरेगाव, चिंचाळा ता. चंद्रपूर, माळीवाडा ता. पाथरी,  शिराढोण ता. कळंब, साखरा ता. वाशिम, वरखेड ता. चिखली,चराठे ता. सावंतवाडी, खर्डी नं. 1 ता. शहापूर या शाळांना आंतरराष्ट्रीय दर्जा देऊन तेथील शिक्षण पध्दतीत येत्या जूनपासून सुरू होणार्‍या शैक्षणिक वर्षापासून आमुलाग्र बदल करण्यात येणार आहेत.

शासनाच्या या निर्णयामुळे खासगी  इंग्रजी माध्यमांच्या शाळाकडे वळणारा विद्यार्थी वर्ग या शाळाकडे वळणार आहे. या शाळांच्या अभ्यासक्रमासाठी  स्वतंत्र आणि स्वायत्त महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ तयार केले आहे. ज्ञानाधिष्ठित, समाजभिमुख, एकविसाव्या शतकासाठी कौशल्ये यांना केंद्रस्थानी ठेवून अभ्यासक्रम निर्मिती केली आहे. आंतरराष्ट्रीय ओजस शाळांतील  विविध निकष असलेल्या निवड प्रक्रियेतून निवड झालेल्या मुख्याध्यापक  व शिक्षकांची प्रशिक्षणाबाबत बोपर्डी शाळेचे मुख्याध्यापक संभाजी जाधव, पदवीधर शिक्षक शंकर सूर्यवंशी, प्राथमिक शिक्षक सुरेश यादव, सचिन पांढरपोटे, श्रीमती उज्वला महामुनी, श्रीमती वर्षा फरांदे, यास्मीन मोकाशी यांची निवड करण्यात आली आहे. 2018 व 19 या शैक्षणिक वर्षात पहिली ते तिसरीचा अभ्यासक्रम राबवण्यात येणार आहे. हा अभ्यासक्रम पहिली ते तिसरीसाठी असल्याने  या शाळेतील निवड झालेल्या  मुख्याध्यापक व प्राथमिक शिक्षकांना अभ्यासक्रम व अध्यापन पध्दतीबाबतचे निवासी प्रशिक्षण दि. 14 मे ते 2 जून या कालावधीत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, भायंदर (प) ठाणे येथे आयोजित करण्यात आले आहे. 

 

Tags : satara district Bopardi school, international status