Mon, Sep 24, 2018 03:16



होमपेज › Satara › खोट्या फिर्यादीद्वारे विमा रक्‍कम हडपली

खोट्या फिर्यादीद्वारे विमा रक्‍कम हडपली

Published On: Feb 18 2018 2:03AM | Last Updated: Feb 17 2018 10:36PM



सातारा : प्रतिनिधी

पोलिसांमध्ये ट्रक चोरीची खोटी फिर्याद देऊन इन्शुरन्सची रक्‍कम लाटणार्‍या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी खोटी फिर्याद देणारा ट्रकचा मालक व ट्रक खरेदी करणारे तीन भंगार व्यावसायिक अशा चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 23 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला आहे. 

ट्रकमालक अतुल सुभाषचंद्र साळुंखे (वय 33, रा. त्रिमूर्ती कॉलनी, गोडोली, सातारा) व भंगार व्यावसायिक आसिफ रफिक पठाण (29, रा. करवीर, जि. कोल्हापूर), जमीर इब्राहिम हारचीकर (40, रा. जवाहरनगर, जि. कोल्हापूर) व अन्वर दाऊद कच्छी (56, रा. संभाजीनगर जि. कोल्हापूर) यांना अटक केली आहे. 

जिल्ह्यात ट्रक चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे ट्रक चोरी करणार्‍या संशयितांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक संदीप पाटील व अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार यांनी एलसीबीला दिले होते. रविवारी पो.नि. पद्माकर घनवट यांना दोन इसम हे चोरीचा ट्रक भंगारमध्ये विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक सागर गवसणे व शशिकांत मुसळे यांनी पोलिस पथकाच्या सहाय्याने सातारा-खिंडवाडी येथे गस्त घातली. खबर्‍यांमार्फत मिळालेल्या वर्णनाचा ट्रक दिसल्यानंतर त्यांनी हा ट्रक थांबवून चौकशी केली असता हा ट्रक भंगारामध्ये नेत असल्याची कबुली दोन इसमांनी दिली. 

या प्रकरणाचा अधिक तपास केला असता कोल्हापूर येथील भंगार व्यावसायिकाकडून हा ट्रक खरेदी केल्याचे दोन इसमांनी सांगितले. त्यावरून त्या भंगार व्यावसायिकाला ताब्यात घेतल्यानंतर ट्रकच्या मालकानेच हा ट्रक आपल्याला विकल्याचे त्याने सांगितले. 

ट्रक मालक अतुल साळुंखे याने परस्पर ट्रक भंगार व्यावसायिकांना विकून इस्लामपूर, (जि. सांगली), म्हापसा (गोवा) व सातारा या ठिकाणी खोट्या फिर्यादी दिल्या. खोट्या फिर्यादी देऊन इस्लामपूर येथून चोरीस गेलेल्या ट्रकची विम्याची रक्‍कमही हडपली आहे. असिफ पठाण, जमीर हराचीकर व अन्वर कच्छी या भंगार व्यवसायिकांनी हे चोरीचे ट्रक खरेदी केले होते. त्यांच्याकडून सातारा जिल्ह्यातील 6, सांगलीतील 1 व गोवा येथील कार चोरीचा 1 गुन्हा असे 8 गुन्हे उघडकीस आले आहेत. यांच्याकडून 1 ट्रक व 1 एसयूव्ही कार जप्‍त करून 23 लाख 2 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला आहे. 

दरम्यान, जिल्ह्यात ट्रकमालक हे त्यांचा स्वत:चा ट्रक हा परपस्पर भंगार व्यावसायिकांना विकून तोच ट्रक चोरीस गेल्याचा बनाव करून खोटे गुन्हे दाखल करणार्‍या ट्रक मालकांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईत सहाय्यक फौजदार विलास नागे, संजय पवार, ज्योतीराम बर्गे, पोना मोहन नाचण, रविंद्र वाघमारे, योगेश पोळ, नितीन भोसले, संतोष जाधव, राजकुमार ननावर, प्रवीण कडव, गणेश कचरे,  मारूती अडागळे यांनी सहभाग घेतला.