Wed, May 22, 2019 14:40होमपेज › Satara › मलकापूर नगरपंचायतीची चौकशी करू

मलकापूर नगरपंचायतीची चौकशी करू

Published On: May 18 2018 1:19AM | Last Updated: May 18 2018 12:06AMकराड : प्रतिनिधी 

अशोकराव थोरात यांनी मलकापूर नगरपंचायतीच्या कारभाराबाबत उपस्थित केलेले मुद्दे गंभीर आहेत. त्यामुळेच त्यांना कागदपत्रे देण्याचे आवाहन करत राज्य शासन या आरोपांची गांभीर्याने चौकशी करेल. तसेच चौकशीत दोषी आढळणार्‍यांवर कठोर कारवाई करू, अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

मलकापूर (ता. कराड) येथील प्रीतिसंगम मंगल कार्यालयात झालेल्या भाजप मेळाव्यात ते बोलत होते. ना. शेखर चरेगावकर, विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, पुरूषोत्तम जाधव, मदनराव मोहिते, अशोकराव थोरात, धोंडीराम जाधव, पै. धनाजी पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

ना. चंद्रकांत पाटील म्हणाले, नळ कनेक्शन देण्याच्या नावाखाली सामान्यांची होणारी लूट तसेच अन्य मुद्यांचा विचार करता अशोकराव थोरात यांनी उपस्थित केलेले विषय लक्षात घेता मलकापूर नगरपंचायतीच्या कारभारात गैरप्रकाराचा मुद्दा गंभीर आहे. शासन निधी देते, ते सर्वसामान्यांच्या घामाचे पैसे असतात. त्यामुळेच अशोकराव थोरात यांच्याकडील कागदपत्रांची मागणी करत ना. पाटील यांनी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली.

ना. पाटील म्हणाले, ज्या - ज्या ठिकाणी भाजपची सत्ता येते, त्या ठिकाणी चांगल्या सोयी - सुविधा देण्याचे काम भाजपकडून केले जाते. आ. पृथ्वीराज चव्हाण हे कराडचे आहेत. त्यांनी कराड पालिकेची निवडणूक लढवली. पण आज त्यांच्याकडे कोणीच राहिलेले नाही. त्यांना सामान्यांचे प्रश्‍न कळत नाहीत. ते बुद्धीमान आहेत. त्यामुळेच त्यांचा उपयोग दिल्लीत आहे. त्यांनी नगरपंचायत, नगरपालिका निवडणुकीत पडू नये, असा टोमणा मारत त्यांचा पक्ष त्यांना दिल्लीला नेणार नसेल, तर आमचा पक्ष त्यांची सोय करेल, अशी कोपरखळी मारत त्यांना राज्य नीट चालवता आले नसल्याची टीकाही ना. पाटील यांनी यावेळी केली.

डॉ. अतुल भोसले म्हणाले, मलकापूरची निवडणूक आम्ही भाजपच्या चिन्हांवर लढणार आहोत.  कराडच्या लोकांनी भाजपचा नगराध्यक्ष निवडून दिला. तेव्हापासून त्यांची उलटी गिनती सुरू आहे. स्व. जयवंतराव भोसले यांचे मागील निवडणुकीवेळी निधन झाले. मात्र, त्याचा फायदा घेत काय काय उचापती करत तिकिटे नाकारली? हे आजही आम्ही विसरलो नाही. 2010 पासून 2014 पर्यंत आ. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. 2011 सालीच मलकापूर नगरपंचायतीची नगरपालिका होणे गरजेचे होते. मात्र, त्याबाबत हेतूपूर्वक पाठपुरावा केला नाही. आमचे सरकार आल्यावर मनोहर शिंदे एकदाच मुख्यमंत्र्यांकडे नगरपालिकेची मागणी घेऊन गेले. आम्हालाही विश्‍वासात घेतले नाही. आ. पृथ्वीराज चव्हाण हे 2014 साली नगरविकास विभागाकडे नगरपंचायतीची नगरपालिका व्हावी, म्हणून आदेश देण्यात आल्याचे सांगतात. त्यामुळेच जर तुम्हाला नगरपालिका करता आली नाही, तर मग कशाला विकासाच्या गप्पा मारता? असा प्रश्‍नही डॉ. अतुल भोसले यांनी यावेळी उपस्थित केला.

अशोकराव थोरात यांनी ऑडिटसह काही मुद्यांना स्पर्श करत मलकापूर नगरपंचायतीच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. मदनराव मोहिते यांनीही यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह आ. आनंदराव पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी ना. चरेगावकर यांचेही भाषण झाले. अशोकराव थोरात यांनी प्रास्ताविक केले.