Tue, Mar 19, 2019 05:09होमपेज › Satara › वराडेतील ‘त्या’ जखमी आईचा मृत्यू

वराडेतील ‘त्या’ जखमी आईचा मृत्यू

Published On: Jul 09 2018 1:07AM | Last Updated: Jul 08 2018 11:46PMतासवडे टोलनाका : वार्ताहर 

वराडे (ता. कराड) येथे 29 जूनला रात्री मुलाच्या चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या कल्पना सदाशिव घोरपडे (वय 60) यांचा शनिवारी मध्यरात्री मृत्यू झाला. त्यांच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू होते. यापूर्वी संशयित सागर घोरपडेच्या हल्ल्यात त्याची पत्नी मोहिनी घोरपडे यांचाही मृत्यू झाला होता. दरम्यान, संशयित सागर घोरपडे याच्यावर अजूनही कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वराडे येथे संशयित सागर घोरपडे याने घरात जेवण झाल्यानंतर आई कल्पना घोरपडे यांच्यासह पत्नी मोहिनी घोरपडे यांच्यावर चाकूने हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर जखमी पत्नी मोहिनी घोरपडे यांचा रूग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. तर कल्पना घोरपडे या गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली होती. 

शस्त्रक्रियेनंतरही त्यांची प्रकृती चिंताजनकच होती. गेली नऊ दिवस कल्पना घोरपडे यांचा मृत्यूशी संघर्ष सुरूच होता. मात्र अखेरपर्यंत त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. शनिवारी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर रविवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, संशयित सागर घोरपडे याच्यावर अजूनही अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून तो बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. 

संशयिताच्या जबाबानंतरच कारण स्पष्ट होणार...

संशयित सागर घोरपडे यांचा जबाब दोनदा नोंदवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आहे. मात्र तो बोलण्याच्या स्थितीत नसल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितल्याने पोलिस हतबल झाले आहेत. स्थानिकांकडून माहिती घेऊनही घटनेमागचे कारण पुढे आलेले नाही. त्यामुळे संशयित सागर घोरपडे यांच्या जबाबानंतरच कारण पुढे येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.