Tue, Jun 25, 2019 15:37होमपेज › Satara › अमीन, दीप्ती ट्रेडर्सवर आयकरचे छापे 

अमीन, दीप्ती ट्रेडर्सवर आयकरचे छापे 

Published On: Jan 11 2019 11:55PM | Last Updated: Jan 11 2019 11:55PM
सातारा : प्रतिनिधी

आयकर विभागाने सातारा शहरात विविध पाच ठिकाणी छापे टाकून अमीन ट्रेडर्स, दीप्ती ट्रेडर्स या दोन व्यापार्‍यांवर कारवाई केली. या व्यापार्‍यांकडून तब्बल पावणे पाच कोटींचा मुद्देमाल लपवल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सातारा सर्कल आयकर विभागाचे अप्पर आयुक्‍त करूण कांत ओझा यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, या कारवाईमुळे शहरातील व्यापार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

सातार्‍यातील व्यापारी आता रडारवर असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. सातारा शहरातील अनेक व्यापारी आयकर वाचविण्यासाठी खरेदी-विक्री व्यवहार, खतावणी आदी भरण्याची टाळाटाळ करत असल्याची माहिती आयकर विभागाच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. यावर गुरुवार आणि शुक्रवारी सातार्‍यातील मार्केट यार्डमधील सीमा शहा यांच्या दीप्ती ट्रेडर्स, तर अमीन अब्दुल शकुर कच्छी यांचा अमीन ट्रेडर्सच्या विविध चार ठिकाणांच्या गोडाऊनवर छापे टाकण्यात आले. यात अमीन ट्रेडर्स यांनी 2 कोटी 50 लाख, तर दीप्ती ट्रेडर्स यांनी 2 कोटी 25 लाख रुपयांचा मुद्देमाल आयकर भरावा लागेल म्हणून खतावणी आणि खरेदी-विक्री व्यवहार यात तफावत दाखवून लपवला असून, मालाचा साठाही जास्त असल्याचे समोर आले. त्यातच हे छुपे उत्पन्‍न असल्याचे तपासात उघडकीस आले. यावेळी त्यांच्याकडून सर्व रकमेवरील कर भरण्याचे प्रतिज्ञापत्रावर लिहून घेतले असल्याचे ओझा यांनी सांगितले. तसेच सातार्‍यातील अनेक व्यापारी कर वाचवण्यासाठी खतावणी भरत नसल्याचे समोर आले असून, अशांवरही लवकरच कारवाई केली जाणार आहे. या दोन कारवायांमुळे अनेक व्यापार्‍यांचे धाबे दणाणले आहे. दरम्यान, झालेली कारवाई प्रधान मुख्य आयकर आयुक्‍त अंशू जैन, प्रधान आयुक्‍त रवींद्र परेल यांच्या मार्गदर्शनाखाली झाली असून, येणार्‍या 2019 या वर्षात कर वाढविण्यासाठी पुढाकार घेण्यात आले असल्याचे ओझा यांनी स्पष्ट केले. कारवाईत आयकरचे उपआयुक्‍त रत्नाकर शेळके, मिलिंद कुंभार, दीपक सोनी यांच्यासह 3 अधिकारी आणि 20 कर्मचारी सहभागी होते.